संध्यानंद.काॅम
तंत्रज्ञानाची वेगवान प्रगती हे सध्याच्या काळाचे वैशिष्ट्य आहे. राेज नवे शाेध लागत आहेत आणि आपले जीवन सुलभ हाेत आहे. पण काेणतेही तंत्रज्ञान कधी अभेद्य नसते. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लाेक त्याचा भेद करण्याचे उपाय शाेधतात. सध्या सर्व जण स्मार्टफाेनचा वापर करतात आणि अनेक व्यवहार त्याद्वारे केले जातात. पण त्यातून सायबर गुन्हेगारी वाढल्याचे दिसते. खाेट्या ल्निंस पाठवून आपले बँक खाते रिकामे करण्याची क्लुप्ती हे गुन्हेगार वापरतात. पण केवळ स्मार्टफाेन आणि काॅम्प्युटरच नव्हे, तर आता स्मार्टटीव्हीच्या हँकिंगचा धाेकाही निर्माण झाला आहे. पारंपरिक टेलिव्हिजन मागे पडून नव्या तंत्रज्ञानावर आधारित टीव्ही आले आहेत आणि स्मार्टटीव्हींचा त्यात समावेश आहे. त्यात असलेल्या अनेक सुविधांमुळे लाेक असे टीव्ही खरेदी करायला लागले आहेत आणि दुसरीकडे स्मार्टटीव्हीच्या हॅकिंगची प्रकरणेही सामाेरी येऊ लागली आहेत. पण याेग्य खबरदारी घेतली, तर त्यापासून बचाव करता येताे, असे सायबर जगातील तज्ज्ञ राेहित जैन यांनी स्पष्ट केले. ते म्हणतात, की आपल्या स्मार्टफाेनमधील साॅफ्टवेअरप्रमाणेच स्मार्टटीव्हीसुद्धा त्यावरच काम करताे.
अशा टीव्हीसाठी इंटरनेटचीही गरज असल्यामुळे स्मार्टटीव्ही हॅक करणे साेपे झाले असून, हॅकर्स त्यांना लक्ष्य करू लागले आहेत. ‘बिल्ट इन मायक्राेफाेन’ची सुविधा असलेले काही स्मार्टटीव्ही आता बाजारात आले आहेत. व्हाॅइस कमांडवर टीव्ही चालावा हा हे मायक्राेफाेन देण्यामागील हेतू असताे. रिमाेटद्वारे व्हाॅइस कमांड देता येईल असे टीव्ही सध्या ट्रेंडमध्ये आहेत. ‘ऑलवेज ऑन व्हाॅइस कमांड’ची सिस्टिम असलेले काही स्मार्टटीव्हीसुद्धा आहेत. तुमच्या बेडरूममधील टीव्हीसमाेर असताना तुम्ही काय बाेलता हे ऐकणे हॅकर्ससाठी अवघड नाही. स्मार्टटीव्हीमध्ये अनेक अॅप्स असतात. अशा टीव्हींसाठी डेडीकेटेड अॅप स्टाेअर असतात आणि तेथून यूजर वेगवेगळी अॅप डाऊनलाेड करतात, अशी माहिती त्यांनी दिली.राेहित जैन पुढे सांगतात, ‘कॅमेरा असलेले स्मार्टटीव्हीसुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. एखादा हॅकर तुमचा स्मार्टटीव्ही हॅक करून कॅमेरा आणि मायक्राेफाेनवर ताबा मिळवू शकताे. तुमच्या बेडरूममध्ये तुमच्यासमाेर टीव्ही आहे आणि काेणी आपल्याला पाहताेय, आपले बाेलणे ऐकताेय याचा पत्ताही तुम्हाला नसताे. अशा काही घटना सामाेऱ्या आल्या आहेत. स्मार्टटीव्ही हॅक करून एका प्रकरणात ब्लॅकमेलिंग केले गेले.’