आपले आरोग्य हे आपल्या खाण्यावर अवलंबून असते. त्यामुळे दिवसभरात पदार्थांची निवड करताना आपण थोडे दक्ष राहणे आवश्यक आहे. कारण आपण खात असलेल्या पदार्थांचा शरीरावर परिणाम होत असतो. त्त्यामुळे एकापाठोपाठ एक अतिखाल्ल्यास किंवा विरुद्ध जातीचे पदार्थ खाल्ल्यास शरीरावर घातक परिणाम होतो. यालाच आयुर्वेदात विरुद्ध आहार म्हणतात.
दूध हे पूर्ण अन्न मानले जाते. त्यामुळे अनेकजण मधल्या वेळेत लागणारी भूक मिटवण्यासाठी दूध पितात. परंतु त्याच्या सोबत काही चुकीचे पदार्थ खाल्ल्यास शरीरात आम निर्मिती होते. हे विषसमान असल्याने अनेकदा आपले आरोग्य बिघडते. त्यामुळे दुधासोबत पुढील पदार्थ खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.
दूध आणि फळं
मिल्कशेक किंवा फ्रुट सॅलड हे चवीला स्वादिष्ट असले, तरीही आयुर्वेदात दूध आणि फळं हा विरुद्ध आहार मानला जातो. आंबट फळं दुधासोबत खाणे टाळावीत. मात्र, अपवादात्मक स्थितीत नैसर्गिकरित्या पूर्ण पिकलेले केळ, आंबा यासारखी गोड फळं तुम्ही शिरा किंवा मिल्कशेकमध्ये वापरू शकता.
दूध आणि मसाला
चमचमीत पदार्थांमध्ये ग्रेवी वाढवण्यासाठी अनेकदा दुधाचा वापर केला जातो. पण, यामुळे शरीरात दोषनिर्मिती होते. म्हणून मसालेदार पदार्थांसोबत दूध पिणे टाळा.
दूध आणि मांसाहार
मासे, चिकन, मटण यांसोबत दूध पिणे टाळा. मांसाहार हा उष्ण असतो, तर दूध हे थंड असल्याने शरीरात दुधातील प्रोटीन व मांसाहार यांमध्ये रिऍक्शन होऊन शरीरात दोष निर्माण होतात. यासोबतच दूध आणि मीठ एकत्र खाणे देखील टाळावे.
आहाराचे शरीरावर होणारे दुष्परिणाम
शरीरात दूध आणि त्याविरुद्ध जातीतील काही पदार्थ एकत्र आल्यास पचनक्रिया बिघडते. परिणामी त्वचेवर रॅश येणे, काही त्वचारोग उत्पन्न होणे, पित्त वाढून उलट्या होणे किंवा अपचन होणे, अशा समस्या उद्भवतात. त्यातूनच शरीरात गंभीर आजारांची निर्मिती होते.