जलस्राेत, नदी, पहाड, पर्वत व जंगलांप्रती देशातील नागरिकांत अनादी काळापासून पावित्र्याची व आदराची भावना हाेती. पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावामुळे ही भावना कमी हाेऊन पर्यावरणाचे सर्वत्र शाेषण हाेत आहे. काही ठिकाणी जंगलमाफिया कार्यरत आहेत. अशा वेळी पर्यावरण रक्षण्यासाठी निसर्गप्रेमींनी अधिकाधिक याेगदान देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी येथे केले.
वन व पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या विविध क्षेत्रांतील 30 व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते राजभवनात पर्यावरण मित्र सन्मान प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बाेलत हाेते. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांना वन विभागातील उल्लेखनीय कार्याबद्दल पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कर्नाळा ट्रस्टचे विश्वस्त चंद्रकांत शहासने लिखित ‘पर्यावरण विचार’ व दिवंगत डाॅ. ब्रह्मशंकर व्यास लिखित ‘गंगा महात्म्यम’ या पुस्तकांचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी वन हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.