बदक पालन हा जगातील एक मोठा फायदेशीर व्यवसाय

    14-Sep-2021
Total Views |

duck_1  H x W:  
 
अतिप्राचीन काळापासून माणूस मांसाकरिता बदकाची शिकार करीत आला आहे, पण बदके माणसाळविणे जास्त फायद्याचे असल्यामुळे ती माणसाळविली गेली. इसवी सनाच्या पहिल्या शतकात त्यांना प्रथम माणसाळविण्यात आले, अशी समजूत आहे, पण चीनमध्ये ती त्यापूर्वीच माणसाळविली गेली होती. पाश्चात्य देशांत विशेषतः अमेरिकेत बदक-पालनाचा व्यवसाय प्रचंड प्रमाणात चालू आहे. भारतात फारच थोडे लोक बदके पाळतात.
 
कोंबड्यांप्रमाणे अंडी व मांस यांच्या उत्पादनासाठी बदके जगामध्ये सर्वत्र पाळली जातात. तथापि व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर ती फारच कमी प्रमाणात पाळण्यात येतात. भारतामध्ये बदके मुख्यत्वे अंड्यांसाठी पाळण्यात येतात. भारतात अमेरिका व युरोपमधील देशांप्रमाणे त्यांचे मांस खाणे फारसे पसंत केले जात नाही.
 
बदकांच्या संगोपनासाठी अगदी साधी व्यवस्था असली तरी चालते. खुराड्यावर छप्पर असले म्हणजे पुरे. तसेच जेथे इतर पशुपक्षी पालनाचा व्यवसाय करता येणार नाही व शेतीही पिकविता येणार नाही अशा पाणथळ, दलदलीच्या जमिनीवर, नदीकिनारी व रुतण जमिनीवर बदक पालनाचा व्यवसाय यशस्वीपणे करता येतो. अशा जमिनीवर बदक पालनाच्या व्यवसाय यशस्वीपणे करता येतो. अशा जमिनीवरील कृमिकीटक व चिंगाटी, कोळंबी वगैरे खाद्य खाऊन ते आपली उपजीविका करतात.
 
बदके दोन प्रकारांनी पाळतात : खुरट गवत असलेल्या मोठ्या मोकळ्या जमिनीवर व घरांच्या परसांमध्ये. प. बंगालमध्ये बहुसंख्य बदके दुसर्‍या प्रकाराने पाळतात. केरळमध्ये नारळांच्या बागांमधील पाण्याच्या चारीमधील कृमिकीटक वगैरे खाऊन बदके आपले पोट भरतात. रात्रीसाठी त्यांना बंदिस्त जागेत कोंडण्याची व्यवस्था असते. कधी कधी त्यांना थोडा कोंडा, धान्य व कंदमुळे द्यावी लागतात.
 
अमेरिका आणि युरोपमधील बहुतेक देशांमध्ये संतुलित पशुखाद्य बनविणार्‍या कारखान्यांमध्ये बदकांसाठी गुलिकांच्या (लहान गोळ्यांच्या) स्वरूपात खाद्य तयार केले जाते. या खाद्यामध्ये ७०% प्रथिने असतात आणि रिबोफ्लाविन व मँगॅनीज सल्फेट यांचे प्रमाणही भरपूर असते.