खेळांची आवड असल्यास क्रीडा व्यवस्थापनात करिअर करा

    14-Sep-2021
Total Views |
 
career_1  H x W
 
क्रीडा व्यवस्थापनात करिअरसाठी बहुविध कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक ठरते. त्यात अचूक नियोजन, नेतृत्व, निर्णयक्षमता, विश्‍लेषण, अचूक मूल्यांकन, कल्पकता, धडाडी, समयसूचकता, संवादकौशल्य, सर्वसमावेशकता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे क्रीडा, व्यायाम आणि शरीरस्वास्थ्याविषयी मनस्वी आवड आणि अधिकाधिक खेळांचे सखोल ज्ञान आवश्यक ठरते.
  
ठिकठिकाणी सर्व वयोगटांसाठी होणार्‍या मॅरेथॉन स्पर्धा, सायकिलग स्पर्धा, ठिकठिकाणी सुरू झालेल्या व्यायामशाळा, मैदानी खेळांचे प्रशिक्षण वर्ग, पंचतारांकित हॉटेल्समधील क्रीडा/व्यायामविषयक सुविधा, मोठ्या शहरांत वाढणार्‍या रिक्रिएशनल क्लब्जची संख्या, यावरून खेळ आणि त्याद्वारे फिटनेस आणि मनोरंजनाकडे जनसामान्यांचा कल वाढत असल्याचे दिसून येते. कदाचित यामागे उंचावलेले जीवनमान, वाढते शहरीकरण आणि आरोग्याबाबतची जागरूकता ही कारणेही असू शकतील.
 
या व्यक्ती व्यवस्थापन विषयाशी निगडित क्षेत्रात पदवीधर असतात. उदा. कायदा, व्यापार, विपणन. खेळाची पार्श्‍वभूमी या करिअरमध्ये प्रवेश करण्यासाठी अनुकूल ठरते. बहुतांश वेळा कसरतपटू, धावपटू, जलतरणपटू आपली क्रीडा कारकीर्द संपुष्टात आल्यानंतर अशा व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश करताना दिसतात.
 
या पदावर काम करण्यासाठी खेळाडू असणे अनिवार्य नाही, परंतु क्रीडाविषयक संस्थांमध्ये काम करण्याचा अनुभव गाठीशी असणे उपयुक्त ठरते. तुम्ही स्पोर्टस् एजंट होऊ शकता. या व्यक्ती एका विशिष्ट खेळाडूच्या किंवा संघाच्या खेळांचे किंवा कार्यक्रमांचे आयोजन करतात. बक्षीस किंवा मानधनाबाबत खेळाडूला/संघाला योग्य असे निर्णय घेतात. कायदेशीर बाबतीत खेळाडूला योग्य सल्ला देतात. खेळाडूची कारकीर्द भरभराटीला यावी यासाठी शक्य ते मार्गदर्शन करतात, खेळाडूच्या प्रगतीसाठी आवश्यक तो जनसंपर्क, मार्केटिंग, जाहिरात हेही सांभाळतात.