यश चुटकीसरशी मिळत नाही

    13-Sep-2021
Total Views |
 
success_1  H x
 
आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या तशा होत नाहीत. हव्या त्यावेळीही होत नाहीत. यश चुटकीसरशी मिळत नाही. त्यासाठी वेळ लागतो.
आपल्याला आपल्या आयुष्याकडे स्वच्छ नजरेनं पाहता यायला हवं. प्रयत्नांत सातत्य हवं. एका मिनिटात कोणतीच गोष्ट घडत नाही. यशाच्या किंवा कोणत्याही मोठ्या ध्येयाच्या दिशेने प्रवास करताना निराश करणारे अनेक प्रसंग घडत असतात. त्यावेळी आपण कशाला या फंदात पडलो, असे वाटण्यासारखी स्थिती असते. आपल्यातली उमेद संपवणारी माणसं भेटत असतात.
ते देखील आपल्याला मागे ओढण्यासाठी टपून बसलेली असतात. पण अशा प्रसंगी आपल्यावर प्रेम करणार्‍या माणसांकडे बघून जगता यायला हवं.
 
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अख्खी दुनिया आपल्याला हाडतुड करत असली तरी आपण आपल्यावर मनापासून प्रेम करायला हवं आणि म्हणायला हवं काहीही होवो मी हे करणारच. मी हे नक्की करू शकतो. अशा पद्धतीने विचार केल्यास एक ना एक दिवस यश सहज हाती येते. काहीजण आपल्या ध्येयावर विश्‍वास ठेवतात, काही नाही. काहीजण आपण जे करायचं ठरवलं आहे त्याला प्रेरणा मिळेल असं सकारात्मक बोलतात, तर काही स्वच्छ सांगतात, तुला काय जमणार, कशाला करतोस. अशा वेळी गोंधळ उडतो.
पण अशा गोंधळाच्या स्थितीत आपल्याला मदत कोण करतं. ती मदत आपणच करायला हवी. आपण आपल्यासाठी ठाम उभं राहावं. मनात आलं ते प्रत्यक्षात झालं या दरम्यानचा प्रवास खूप मोठा असतो. आणि या प्रवासात आपणच आपली भक्कम साथ देणं फार गरजेचं असतं. ते व्हायचं तर एकच मंत्र महत्त्वाचा ठरतो, तो म्हणजे मी हे करू शकतो.
 
जीवनात ध्येय ठेवणे जसे गरजेचे असते तसेच त्या दिशेने रोज एकेक पाऊल टाकणेदेखील तितकेच महत्वाचे असते. आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या तशा होत नाहीत. हव्या त्यावेळीही होत नाहीत. यश चुटकीसरशी मिळत नाही. त्यासाठी वेळ लागतो. जे हवं आहे ते मिळवण्यासाठी स्वत:लाही वेळ द्यावा लागतो.