प्रपंचातील जोडीदाराचा योग्य प्रकारे आदर ठेवा

    13-Sep-2021
Total Views |
 
partner_1  H x
 
आपले व्यक्तिमत्व केवळ घराबाहेर चांगले असून चालत नाही, ते घरातदेखील चांगले असावे लागते. तरच जगण्याला खरा अर्थ प्राप्त होतो.
आपले व्यक्तिमत्व केवळ घराबाहेर चांगले असून चालत नाही, ते घरातदेखील चांगले असावे लागते. तरच जगण्याला खरा अर्थ प्राप्त होतो. त्यामुळे व्यक्तिमत्व विकसित करताना घरातही ते कसे असले पाहिजे. याचा नेमकेपणाने विचार करणे अगत्याचे ठरते. लग्नाची नवलाई असते तोपर्यंत सुरुवातीला एकमेकांच्या तक्रारी मन लावून ऐकून घेतल्या जातात. त्यावर उत्साहाने कामही केले जाते.
 
काही वर्षांनी तक्रारी ऐकून घेतल्या जातात आणि त्यावर नाईलाजाने काम केले जाते. नंतर तक्रारी एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने सोडून दिल्या जातात. अजून काही वर्षांनी त्याच-त्याच तक्रारी ऐकून घेणे देखील जीवावर येते. संसार आणि भांडण हे दोघे हातात हात घालून चालणारे जिगरी दोस्त आहेत. कोणाचाही संसार वाद, भांडणं, तंटे आणि तक्रारींशिवाय झाला नाही, होत नाही आणि होणारही नाही.
 
दोन भिन्न घरातील व्यक्ती स्वभावातील काही गुणांमुळे आकर्षित होतात आणि एकमेकांच्या प्रेमात पडून विवाहबंधनात अडकतात. मात्र एकमेकांचा खरा स्वभाव हा कालांतराने कळायला लागतो. भरपूर गोष्टी खटकायला लागतात. कित्येक गोष्टी पटेनाशा होतात आणि त्यांचे पर्यवसान एकमेकांच्या तक्रारी करण्यात होते...
 
बायको किती खर्चिक आहे, तिला संसार जमत नाही हे बायकोला सांगितल्या शिवाय नवर्‍याला अन्नपाणी गोड लागत नाही. तर नवर्‍याने आपल्याला कधीच वेळ दिला नाही, सासरच्यांसमोर रिस्पेक्ट दिला नाही, आपले म्हणणे कधीच ऐकले नाही या काही तक्रारींचा पाढा सतत वाचला जातो. हे रोजचे रुटीन होऊन जाते.
 
मग एकमेकांच्या या म्हणण्याकडे कोणीच लक्ष देईनासे होते. मात्र ही अगदीच शेवटची पायरी असते. थोडक्यात काय तर आपल्याला कोण विचारतो, अशी स्वतःची समजूत करून काही जोडपी आयुष्य ढकलत असतात. अशी लग्न भले यशस्वी होत असली तरी त्यांच्यातला आनंद कधीच मावळलेला असतो. एक तडजोड म्हणून ते आयुष्य एकत्र काढतात. म्हणून एकमेकांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आदर राखत प्रत्येकाने घरात समोरच्याला आदर देणे आवश्यक असते.