अपचन टाळण्यासाठी पावसाळ्यात काय खाणं टाळावं?

    13-Sep-2021
Total Views |
 
food_1  H x W:
 
पावसाळ्यात हवेत आर्द्रता अधिक असते. शिवाय पचनासाठी पोषक वातावरणही नसते. त्यामुळे जास्त जड पदार्थ, शिळे पदार्थ खाल्ले, तर अपचनाचा त्रास होतो. भूकही फार लागत नाही. म्हणूनच आहारविषयक पथ्यं पाळणं खूप गरजेचं आहे. या दिवसात काय खाणं टाळाल, जाणून घ्या...
 
मसालेदार पदार्थ खाणं टाळा
पावसाळ्यात पावसाचा आनंद घेता घेता भजी, वडे खाण्याची इच्छा होते; पण लक्षात ठेवा, हे जास्त मसालेदार नसावं. जास्त मिरची, मसाल्यांमुळे आतड्यांमध्ये जळजळ निर्माण होते. खूप जास्त मीठ असणारे पदार्थही खाऊ नका. जास्त मीठ वॉटर रिटेंशनची स्थिती निर्माण करते. ज्यामुळे शरीरावर सूज येते. रक्तदाब वाढतो.
 
कच्चं सलाड-भाज्या खाऊ नका
पावसाळ्याच्या दिवसात कच्चं सलाड खाणं टाळायला हवं. याशिवाय पालेभाज्या, हिरव्या भाज्या कच्च्या खाणं टाळायला हव्यात. या पाण्यात उकळून किंवा गरम गरम भाजीच्या स्वरूपात खाऊ शकता.
 
मासे आणि मांस टाळा
पावसाळ्याच्या दिवसात मांसाहार मग ते मासे असोत वा अन्य कोणत्याही प्रकारचं मांस, मटण त्यामध्ये बॅक्टेरिया निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून पावसाळ्यात मांसाहार खाणं टाळायला हवं किंवा व्यवस्थित शिजवून मगच अशा आहाराचं सेवन करायला हवं.
 
चहा-कॉफी कमी प्रमाणातच
पावसाळ्यात हवेतील गारव्यामुळे चहा किंवा कॉङ्गी पिण्याची इच्छा पुन्हा पुन्हा होते. पण, कॅफिनयुक्त असे पेय पदार्थ कमी प्रमाणातच प्या. शरीरात कॅफिनच अधिक प्रमाण डिहायड्रेशनची समस्या वाढविते. डिहायड्रेशनमुळे आरोग्याशी संबंधित अन्य समस्याही निर्माण होतात.
 
आजमावून बघा...
सर्दी-खोकला किंवा ताप आल्यानंतर एक कप कोमट पाण्यात चिमूटभर सुंठ मिसळून प्या. असं पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा प्या.
व्हायरल फिवर झाल्यास पाण्यात तुळशीची पानं आणि आलं मिसळून उकळा. त्यामध्ये मध मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा प्या.
पावसाळ्याच्या दिवसात घरात निलगिरीचं तेल ठेवा. जेव्हाही श्‍वास घेण्यास समस्या जाणवेल, तेव्हा रुमालावर या तेलाचे तीन-चार थेंब टाका आणि वास घ्या. गरम पाण्यात या तेलाचे काही थेंब टाकून वास घेण्याने त्वरित आराम मिळतो.