गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती : पिंपरीत उभारणार सायबर ठाणे
राज्याच्या पाेलिस दलासमाेर महिला सुरक्षेचे प्रमुख आव्हान उभे ठाकले आहे. गुन्हेगारांना कठाेर आणि तातडीने शिक्षा व्हावी, यासाठी शक्ती कायदा करण्यात येत आहे. कायद्याचे विधेयक विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात मांडले जाईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी येथे दिली. तसेच, सायबर गुन्ह्यांना चाप लावण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर पाेलिस ठाणे उभारण्यात येईल, असेही वळसे पाटील यांनी सांगितले.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयाेजित वार्तालापात वळसे पाटील बाेलत हाेते. पुण्यात अल्पवयीन मुलींचे अपहरण करून बलात्कार केल्याच्या दाेन घटना घडल्या आहेत. राजगुरुनगर येथेही 12 वर्षाच्या मुलीवर बलात्काराची घटना घडली. त्या पार्श्वभूमीवर वळसे पाटील म्हणाले, की महिला सुरक्षेचा माेठा प्रश्न असून, त्याबाबत राज्य सरकारने यापूर्वीच ‘शक्ती’ कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार गुन्हेगारांना ठरावीक कालावधीत शक्षा हाेणार आहे. हा कायदा सध्या प्रशासकीय कार्यवाहीत असून, आगामी अधिवेशनात ताे मांडण्यात येईल.सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी राज्यात 45 फाॅरेन्सिक लॅब सुरू केल्या आहेत. त्याद्वारे सायबर गुन्ह्यांचा तपास जलदगतीने हाेत आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार सायबर पाेलिस ठाण्यांची संख्या वाढवण्यात येत आहे.पिंपरी-चिंचवड पाेलिस आयुक्तालयातही एक सायबर ठाणे सुरू केले जाणार आहे, अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली. नागरिकांच्या साेयीसाठी गृह विभागाने ‘डायल 112’ या उपक्रमाची आखणी केली आहे. त्याअंतर्गत नागरिकांनी 112 या हेल्पलाइनवर मदत मागितल्यानंतर किमान 15 मिनिटांत पाेलिस त्यांच्यापर्यंत पाेहाेचतील, अशी माहितीही त्यांनी दिली.