ज्येष्ठा गौरींना विदर्भात महालक्ष्म्या म्हणतात. ‘लक्ष्मी’ या शब्दाआधी ‘महा’ हे विशेषण लावून ‘महालक्ष्मी’ हा शब्द तयार झाला. मराठवाड्यात ‘लक्ष्म्या’, तर कोकणात ‘गौरी’ म्हणून म्हटलं जातं.
ज्येष्ठा गौरीची एक कथा अशी सांगितली जाते, की गौरीचा सण आला असताना एका दरिद्री ब्राह्मणाची मुलगी घरी गौर आणावी म्हणून हट्ट धरते. दारिद्य्राला कंटाळून ब्राह्मण जीव देण्याच्या हेतूने तळ्याकाठी जातो. तिथे त्याला एक म्हातारी बाई भेटते आणि ती त्याचे सांत्वन करते व त्याच्या घरी येते. ब्राह्मण तिची सेवाशुश्रूषा करतो. त्यामुळे ब्राह्मणाचे दारिद्य्र दूर होते. ती बाई तिसर्या दिवशी परत जायचा आग्रह धरते.
जाताना ब्राह्मणाला दरवर्षी ज्येष्ठा गौरी व्रत करण्यास सांगते. ते कसे करायचे ते सांगताना, त्यात पाणवठ्याजवळून दोन खडे आणावे व एकाला ‘ज्येष्ठा’ व दुसर्याला ‘कनिष्ठा’ अशी नावे ठेवून त्यांचे पूजन करावे. पहिल्या दिवशी आवाहन, दुसर्या दिवशी पूजन, भोजन, जागरण आणि तिसर्या दिवशी बोळवण, असा क्रम ठेवावा. विसर्जनानंतर तिथली माती आणून घरात दारात टाकावी म्हणजे समृद्धी येते, असे व्रत ती सांगते. त्यामुळे काही ठिकाणी नदीतील खडे आणून हे व्रत केले जाते.
ज्येष्ठा गौरीची विविध पद्धतीने पूजा करण्याची प्रथा :
देवता एकच असली, तरी तिची वेगवेगळ्या ठिकाणी विविध पद्धतीने पूजा करण्याची प्रथा आहे.
ज्येष्ठा गौरीपूजन महाराष्ट्रात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते.
अनुराधा नक्षत्रावर तिचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर तिचे पूजन व मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन,
असे तीन दिवसांचे हे व्रत आहे. याला ज्येष्ठा गौरीपूजन असे म्हटले जाते.
काही ठिकाणी या गौरींचे सोन्या-चांदीचे व पितळेचे मुखवटे असतात. या मूर्तींना साड्या नेसवून, दागदागिने घालून सजविले जाते. काही ठिकाणी कागदावर चित्र काढून पूजन केले जाते. काही गावांत नदीतील पाच खडे किंवा लहान दगड आणून त्याची पूजा करतात. काही ठिकाणी मातीचे लहान घट आणून त्यात हळद बांधलेला दोरा, खारीक आणि खोबरे घालतात आणि हे घट एकावर एक ठेवून ती उतरंड गौरी म्हणून पूजतात. महाराष्ट्रात भाद्रपद शुद्ध सप्तमीला गौरीचे आगमन होते. ज्येष्ठा गौरींना विदर्भात महालक्ष्म्या म्हणतात. ‘लक्ष्मी’ या शब्दाआधी ‘महा’ हे विशेषण लावून ‘महालक्ष्मी’ हा शब्द तयार झाला. मराठवाड्यात ‘लक्ष्म्या’, तर कोकणात ‘गौरी’ म्हणून म्हटलं जातं.