नवी मुंबईत महापालिकेचा लसविक्रम ; दिवसभरात 38,086 जणांना लसमात्रा

    11-Sep-2021
Total Views |
 
 
 

vaccination_1   
 
जानेवारीपासून शहरात काेराेना लसीकरण सुरू झाल्यानंतर आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक लसीकरण बुधवारी करण्यात आले. दिवसभरात 38086 जणांना लस देण्यात आली असून, यात पालिकेच्या केंद्रांवर 34112, तर खासगी रुग्णालयांत 3974 जणांना लस देण्यात आली. यापूर्वी एका दिवसात सर्वाधिक 24800 जणांना लस देण्यात आली हाेती.नवी मुंबई महापालिकेला काेव्हिशिल्डच्या 45600 लसमात्रा मिळाल्या हाेत्या.त्यामुळे बुधवारी 18 ते 44 वयाेगटासाठी पहिल्या मात्रेचे शंभर केंद्रांवर मेगा लसीकरण आयाेजित केले हाेते. यात 41 हजार जणांना लस देण्याचे नियाेजन करण्यात आले हाेते.एकीकडे पाऊस, तर दुसरीकडे दाेन दिवसांवर आलेला गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवरही बुधवारी सर्वाधिक लसीकरण झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. पालिकेने शहरात 100 केंद्रांवर लसीकरणाचे नियाेजन केले हाेते.
 
त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आगामी काळात माेठ्या प्रमाणात लस प्राप्त करण्यासाठी पालिका प्रयत्नशील असून, जास्तीत जास्त मेगा लसीकरणासाठी पालिका लस उपलब्धतेनुसार तयार असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. शहराच्या 15 लाख लाेकसंख्येपैकी 10 लाख 80 हजार नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. या लसीकरणामुळे 9 लाखांहून अधिक नागरिकांना पहिल्या लसमात्रेचे सुरक्षाकवच मिळाले आहे. तिसऱ्या लाटेपूर्वी लसपात्र असलेल्या 100 टक्के नागरिकांना किमान एक मात्रा देण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.