मुंबईतील कांदळवनांवर सीसीटीव्हीची नजर

    10-Sep-2021
Total Views |
 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत विविध निर्णयांना मान्यता
 
 
CM_1  H x W: 0
 
कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांवर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाच्या चाैथ्या बैठकीत घेण्यात आला.यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या अहवालानुसार मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात (एमएमआरडीए) 106 संवेदनशील ठिकाणी एकूण 279 सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. यासाठी 35 काेटींचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यांत राबवण्याचे निश्चित करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात भिवंडी, दुसऱ्या टप्प्यात पश्चिम व मध्य मुंबई व तिसऱ्या टप्प्यात नवी मुंबई व ठाणे खाडी फ्लेमिंगाे अभयारण्याचा समावेश आहे.
 
एमएमआरडीएने एमटीएचएल प्रकल्पांतर्गत कांदळवन संशाेधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी 10 काेटींचा निधी दिला असून, त्यातून भक्ती पार्क, वडाळ्यात हे केंद्र उभारण्यात येत आहे. त्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली. बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री साेसायटीने सादर केलेल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीतील स्थलांतरित पक्ष्यांच्या स्थलांतर मार्गाचा अभ्यास करण्याच्या प्रस्तावासही बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचा कालावधी पाच वर्षांचा आहे.यासाठी कांदळवन प्रतिष्ठान आणि बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री साेसायटीत सामंजस्य करार करण्यात आला आहे.कांदळवन प्रतिष्ठानने सागरी व किनारी जैवविविधतेच्या संवर्धन कार्यात लक्षणीय काम करणाऱ्या व्यक्तींना कांदळवन प्रतिष्ठान पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची, काेस्टवाईज उत्सवाच्या आयाेजनाची माहिती बैठकीत देण्यात आली. याशिवाय कांदळवन प्रतिष्ठानसमवेत सुरू असलेल्या काही संशाेधन प्रकल्पांना मंजुरी, अनुदानित प्रकल्पांना मुदतवाढीचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.