आपण ओळखता का आपल्या मुलांच्या आवश्यक गरजा?

    31-Aug-2021
Total Views |

children_1  H x 
 
मुले स्वभावत: चंचल असतात व एके ठिकाणी जास्त काळ बसू शकत नाहीत. पण काही मुले आपल्या वयानुसार वागू शकत नाहीत. ती फार काळ एका गोष्टीवर वा कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. अशा मुलांना ‘स्पेशल नीड्स चिल्ड्रेन’ म्हणतात. 
 
अधू दृष्टी, बहिरेपणा वा इतर शारीरिक अपंगत्व सहजतेने दिसते पण डिस्लेक्सिया, ऑटिज्म व डिस्ग्राफिया अशा समस्या चटकन दिसत नाहीत. त्यामुळे अशा मुलांचा विकास होऊ शकत नाही व इतर मुलांच्या तुलनेत ती मागे राहतात.
 
सुरुवातीपासूनच लक्ष द्या : प्रत्येक मुलाच्या विकासाचा वेग वेगळा असतो, पण वस्तू पकडणे, दृष्टी रोखणे, गोष्ट समजणे वा एखाद्या गोष्टीवर हसून वा रडून प्रतिक्रिया देणे, अशी काही मोटर स्किल्स सर्व मुले पहिल्या वर्षातच शिकतात. तसेच बोलणे, स्वत:च्या हाताने जेवण्याचा प्रयत्न करणे, इतर मुलांसोबत खेळणे अशा सवयींचा विकास सुरुवातीच्या दोन वर्षांत होतो. पण जर मूल आक्रमक स्वभावाचे असेल वा स्वत:ला वा इतरांना दुखापत करीत असेल तर सावध व्हायला हवे. अशा काही लक्षणांवरूनच मूल सामान्य आहे की नाही, हे समजते.
 
लक्ष केंद्रित करू न शकणे : जर मुलाचे मन जास्त काळ कोणत्याही एका कामात लागत नसेल तर लक्ष देण्याची गरज असते. अशी मुले जास्त काळ कोणतेही एक काम करू शकत नाहीत व इतर मुलांशीही जास्त वेळ खेळू शकत नाहीत. कारण ती कोणत्याही एकाच कामावर लक्ष केंद्रित करू शकत नसतात.
 
स्वत:वर ताबा ठेवू न शकणे : काही मुले अत्यंत हट्टी असतात व कोणत्याही स्थितीत स्वत:चेच खरे करण्याचे प्रयत्न करतात. बहुधा आई-वडील अशा मुलांना जास्त लाडका म्हणून गोष्टी दुर्लक्षित असतात. पण असे वागणे एखाद्या समस्येकडे इशाराही असू शकतो. गरजेपेक्षा जास्त बोलणे, आरामात खेळू न शकणे, आपल्या पाळीची वाट पाहू न शकणे वा इतरांचे बोलणे मध्येच थांबवून स्वत: बोलू लागणे, अशी लक्षणे इशारा ठरू शकतात.
 
समवयस्कांशी मैत्री करू न शकणे : समवयस्क मुलांशी मैत्री करण्यासाठी काही खास करण्याची गरज नसते. कारण जेव्हा चार मुले एकत्र येतात तेव्हा ती चटकन खेळ सुरू करतात. पण स्पेशल नीड्सची मुले सहजतेने इतर मुलांमध्ये मिसळू शकत नाहीत व त्यांच्यापासून दूर दूर राहतात. अशा मुलांना गोंगाट, भडक रंग वा जास्त गर्दीचाही त्रास होऊ शकतो.
 
वयानुसार अक्षरज्ञान नसणे : मूल जर समवयस्क मुलांप्रमाणे बोलू वा वाचू शकत नसेल तर ते गांभीर्याने घ्यावे. कधी कधी पालक याला समस्या न मानता सारा दोष मुलावर लादतात की त्याचे अभ्यासात लक्षच नाही. पण हे योग्य नाही. जर असे प्रत्येक विषयात होत असेल तर इतर एखाद्या समस्येचे लक्षणही असू शकते. विशेषत: गणित समजत नसेल तर तो डिस्कलेक्सिया नावाचा त्रास असू शकतो.
 
कुटुंबात इतर कोणी पीडित असल्यास : जर कुटुंबात इतर कोणाला लिहिण्या-वाचण्याची समस्या असेल तर लहान मुलांकडे जास्त लक्ष देण्याची गरज असते. असे असल्यास त्यांच्यातही समस्या होण्याची शक्यता वाढते.