आश्रमशाळांतील आठवी-बारावीचे वर्ग आजपासून पुन्हा सुरू हाेणार

02 Aug 2021 14:47:30
 
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शाळा प्रशासनास सूचना
 

orphanage_1  H  
 
‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत गेल्या वर्षी डिसेंबरपासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारीपासून काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा बंद करण्यात आले हाेते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलैच्या निर्णयानुसार आश्रमशाळांतील 8 वी ते 12 वीचे वर्ग साेमवारपासून (2 ऑगस्ट) सुरु करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल साेनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.काेराेनाकाळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी हाेते. या काळात वाढते बालविवाह, बालमजुरीसारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार करता माेठ्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्यासंदर्भात आदिवासी विकासमंत्री अ‍ॅड. के.सी. पाडवी, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास विभागातील शाळा आणि वसतिगृहे सुरु करण्यात येत आहेत.
 
आश्रमशाळा सुरू करण्यापूर्वी व सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्याप्रमाणे, आश्रमशाळा निवासी असल्याने पाल्याला शाळेत व वसतिगृहात पाठवण्यापूर्वी पालकांचे संमतिपत्र घेणे बंधनकारक राहणार आहे. तसेच, शाळा आणि वसतिगृहे सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांची स्वच्छता आणि सुरक्षितता ठेवणे, शालेय वेळापत्रक बनवणे, भाेजन वेळेचे नियाेजन करणे, काेराेनाबाधित आढळल्यास याेग्य ती दक्षता घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, असेही साेनवणे यांनी स्पष्ट केले आहे.
Powered By Sangraha 9.0