भविष्यातील गरज ओळखून वीजयंत्रणा सक्षम करा

    02-Aug-2021
Total Views |
 
उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश : पुण्यातील वीजविषयक कामांचा आढावा
 

electricity_1   
 
शहरी व ग्रामीण भागात सर्व वर्गवारीतील वीजजाेडण्यांची मागणी वाढते आहे. साेबतच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीच्या प्रारूप विकास आराखड्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे भविष्यकालीन गरज ओळखून तत्काळ वीजजाेडण्या देण्यासाठी व दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाला वेग द्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री व जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिले.येथील विधान भवनात आयाेजित जिल्हा विद्युत वितरण सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बाेलत हाेते.
 
या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गाेऱ्हे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, पिंपरी-चिंचवडच्या महापाैर माई ढाेरे, जिल्ह्यातील सर्व आमदार, विभागीय आयुक्त साैरभ राव, जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार (पुणे) व राजेश पाटील (पिंपरी चिंचवड), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पाेलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (पुणे), कृष्णप्रकाश (पिंपरी चिंचवड), जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. अभिनव शमुख, महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार (पुणे परिमंडल) व सुनील पावडे (बारामती परिमंडल), तसेच समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित हाेते.
 
समितीच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने सूचना देत जिल्ह्यातील वीजविषयक कामांचा आढावा घेतला. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांनी सद्यस्थितीत ओव्हरहेड असलेल्या लघुदाब वीजवाहिन्या भूमिगत करण्यास प्राधान्य द्यावे. आमदार निधीतील विविध कामांच्या अंदाजपत्रकांच्या मंजुरीची कार्यवाही वेगवान करण्यासाठी महावितरणने नाेडल अधिकारी नेमावा. तसेच, विविध याेजनांतील वीजयंत्रणेची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदारच झाली पाहिजेत, असे निर्देश पवार यांनी दिले.
सचिन तालेवार यांनी पुणे जिल्ह्यातील वीजविषयक विविध याेजनांचे सादरीकरण केले. या बैठकीत लाेकप्रतिनिधी, तसेच समितीच्या अशासकीय सदस्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. त्या संदर्भात तालेवार व पावडे यांनी निवेदन करत प्रश्न साेडवण्याची ग्वाही दिली.