राज्यभरात शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण बालभारतीकडून सुरू

    09-Jul-2021
Total Views |
 
 
पुस्तकांच्या पावणेदाेन काेटींवर पीडीएफ डाऊनलाेड

balbharati_1  H 
 
समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तके आणि स्वाध्याय पुस्तिकांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील दुर्गम भागात पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार असून, उर्वरित ठिकाणीही पुस्तके काही दिवसांत दिली जातील.शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वितरणाचा प्रारंभ बालभारतीत करण्यात आला.
बालभारतीचे संचालक दिनकर पाटील, प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, राज्य शैक्षणिक संशाेधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर, बालभारतीचे नियंत्रक विवेक गाेसावी आदी यावेळी उपस्थित हाेते.पाठ्यपुस्तकांच्या छपाईसाठी आवश्यक असणाऱ्या कागदासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे पुस्तक छपाईस विलंब झाला हाेता. हे प्रकरण निकाली निघाल्यानंतर पुस्तकांची छपाई करून वितरण सुरू करण्यात आले आहे.पाठ्यपुस्तकांच्या वितरणात पहिल्या टप्प्यात दुर्गम भागात पुस्तकांचे वितरण हाेणार आहे.
 
उर्वरित ठिकाणीही लवकरच पाठ्यपुस्तके उपलब्ध हाेतील.बालभारतीने पहिली ते बारावीच्या सर्व पुस्तकांच्या पीडीएफ संकेतस्थळावर माेफत डाऊनलाेडसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. आतापर्यंत सुमारे 1 काेटी 78 लाख पुस्तके डाऊनलाेड झाली आहेत, असे गायकवाड यांनी सांगितले.पाठ्यपुस्तकांच्या वितरणासंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी एक प्रतिनिधी नियुक्त करावा, समन्वय राखून पाठ्यपुस्तकांचे वितरण करावे, तालुकास्तरावर प्राप्त झालेली पाठ्यपुस्तके सुरक्षित राहतील, याची काळजी घ्यावी, शाळा स्तरावर पाठ्यपुस्तके प्राप्त झाल्यावर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करून त्याची नाेंद करावी, काेराेनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देताना गर्दी हाेणार नाही, याची दक्षता घ्यावी, जिल्ह्यातील पुस्तकांची तालुकानिहाय, विषयनिहाय यादी करून शिक्षणाधिकाऱ्यांनी बालभारतीला कळवून पुस्तके बदलून घेण्याची कार्यवाही करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.