ऊर्जा विभागात स्थापणार ‘आपत्ती व्यवस्थापन’ विभाग : डाॅ. नितीन राऊत

    31-Jul-2021
Total Views |
 
 

electricity_1   
 
महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे हाेणारे नुकसान टाळण्यासाठी ऊर्जा विभागात आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी चिपळूण दाैऱ्यादरम्यान दिली. गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, निसर्ग व ताैक्ते चक्रीवादळ व पुरामुळे वीज यंत्रणेचे खूप नुकसान झाले आहे. वीजयंत्रणा उघड्यावर असल्यामुळे प्रथम नैसर्गिक संकटाचा सामना ऊर्जा विभागाला करावा लागताे.यावर उपाययाेजना व संभाव्य संकटाला ताेंड देण्यासाठी आपत्ती विभाग स्थापन करण्याचा मानस असल्याचे डाॅ. राऊत यांनी सांगितले.
 
चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे माेठ्या प्रमाणात नद्यांना पूर आल्याने महावितरण व महापारेषणच्या यंत्रणांचे अताेनात नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी डाॅ. राऊत यांनी चिपळूण तालुक्याला भेट दिली. पुरामुळे नादुरुस्त झालेल्या ग्राहकांचे मीटर त्वरित बदलून देण्याचे निर्देश त्यांनी महावितरणला दिले.चिपळूण शहर व तालुक्यात अनेक भागांत तारांसह खांब जमीनदाेस्त झाले.अशा परिस्थितीत पुराचा सामना करत, डाेंगरदऱ्यांतून अवजड खांब, राेहित्रे व इतर अवजड सामग्री खांद्यावर वाहून नेऊन महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी बहुतांश भागाचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. त्यांच्या या कामगिरीचे डाॅ. राऊत यांनी काैतुक केले. तालुक्यातील कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी वीज कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.