आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला आता वेग

    27-Jul-2021
Total Views |
 
क्रीडामंत्री सुनील केदार यांची माहिती : ऑक्टाेबरपासून दाेन अभ्यासक्रम हाेणार सुरू
 

sports_1  H x W 
 
 
देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातून हाेत असून, या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांसाठी येत्या ऑक्टाेबरपासून प्रवेश प्रक्रिया राबवण्याबाबतचे नियाेजन करण्यात आल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. विद्यापीठ सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक पदांची भरती प्रक्रिया व पायाभूत सुविधांच्या निर्मितीबाबत आवश्यक बाबींची पूर्तता करावी, अशी सूचना, असे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केली.राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथिगृहात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार राेहित पवार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, क्रीडा व युवक कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकाेरिया, वास्तुशास्त्रज्ञ शशी प्रभू, सिम्बायाेसिसच्या प्रमुख संचालक डाॅ. विद्या येरवडेकर आदी मान्यवर उपस्थित हाेते.
 
कुलगुरू, कुलसचिव, प्राध्यापक आदी महत्त्वपूर्ण जागा भरणे आवश्यक आहे.त्यासाठी प्रशासकीय प्रकिया तातडीने पूर्ण करावी, असे पवार यांनी सांगितले.आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून, हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. तेथे चांगले प्रशिक्षक तयार हाेतील. राज्यातून चांगले खेळाडू तयार हाेतील, असे केदार यांनी सांगितले. बकाेरिया यांनी क्रीडा विद्यापीठाबाबत सादरीकरण केले.आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठांतर्गत पहिल्या टप्प्यात दाेन अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात येणार आहे. बीबीए (स्पाेर्ट मॅनेजमेंट) व बीएससी (स्पाेर्ट सायन्स) या दाेन अभ्यासक्रमांसाठी साधारणपणे येत्या ऑक्टाेबरपासून प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. या अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी 60 एवढी विद्यार्थी संख्या असेल.