छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ले रायगडावर आता दुसरा राेप-वे उभारण्यात येणार आहे. राेप-वेसाठी नुकतीच स्वारस्याची अभिव्यक्ती मागवण्यात आली असता अनेक माेठ्या कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे. रायगडावर 1996 मध्ये पहिल्यांदा राेप-वे उभारण्यात आला हाेता. मात्र, ताे जुना झाला आहे. 12 महिने गडावर शिवप्रेमींचा राबता असताे. देशी-विदेशी पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस माेठी वाढ हाेत आहे. इतिहासप्रेमीही रायगडाला आवर्जून भेट देतात. त्यामुळे गडावर येणाऱ्या पर्यटकांच्या साेयीसाठी दुसरा राेप-वे उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.रायगड विकास प्राधिकरण आणि स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांची नुकतीच याबाबत बैठक पार पडली. या बैठकीत प्राधिकरणाने गडावर दुसरा राेप-वे उभारण्याचा प्रस्ताव सादर केला. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्याला मंजुरी दिली. राेप-वे उभारण्यासाठी टाटांसह दिग्गज कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे.