आवश्यक त्या सर्व उपाययाेजना करा आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा बंदाेबस्त करा, असे आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. पिंपरी आयुक्तालयाला भेडसावणारे अपुरे मनुष्यबळ आणि वाहनांची कमतरता या समस्या साेडवण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पिंपरी पाेलिस आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन गृहमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी व इतर विषयांचा आढावा घेतला. पाेलिस महासंचालक संजय पांडे, आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पाेकळे यांनी गृहमंत्र्यांचे स्वागत केले.पिंपरीच्या नियाेजित मुख्यालयाच्या इमारतीसाठी चिखलीतील चार एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यासंदर्भात आवश्यक कार्यवाहीचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
पाेलिस मुख्यालयाची नियाेजित इमारत सर्व साेयीसुविधांनी सज्ज असेल.राज्यात लवकरच 5200 पाेलिस शिपाई पदे भरली जाणार आहेत. त्यातील 720 पिंपरीसाठी मिळतील, असे त्यांनी सांगितले.राज्यात पुरुष कैद्यांसाठी खुली कारागृहे आहेत. महिलांसाठी खुले कारागृह निर्माण करण्यात येणार असून, येरवडा कारागृहाच्या आवारात कारागृह विभागाच्या मुख्य कार्यालयाची इमारत बांधण्यात येणार आहे, असे वळसे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, वळसे पाटील यांनी येरवडा कारागृह विभागास भेट देऊन पाहणी केली. अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये, संजय पांडे, अतिरिक्त पाेलिस महासंचालक सुनील रामानंद, उपमहानिरीक्षक याेगेश देसाई, कारागृह अधीक्षक यू. टी. पवार आदी या प्रसंगी उपस्थित हाेते.