टाेकियाे ऑलिम्पिकमुळे संसर्ग वाढण्याची भीती

    21-Jul-2021
Total Views |
 
आतापर्यंत केवळ 15 टक्के नागरिकांचे लसीकरण; बाहेरून येणाऱ्यांमुळे इन्फेक्शनची शक्यता
 

Tokyo_1  H x W: 
 
जपानमध्ये हाेणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमुळे काेराेनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जपानमध्ये गेल्या काही दिवसांत संसर्ग तीव्र झाल्यामुळे ही चिंता वाढली आहे.टाेकियाे ऑलम्पिक स्पर्धेला येत्या 23 जुलै राेजी प्रारंभ हाेत असून, ही स्पर्धा काेराेनामुक्त राहील, असा विश्वास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थाॅमस बेंच यांनी व्यक्त केला असला, तरी नागरिकांना ताे मान्य नाही. येथे आतापर्यंत केवळ 15 टक्के लाेकांचे लसीकरण झाले असून, त्यात 65 वर्षांवरील नागरिक जास्त आहेत. त्यामुळे तरुणवर्गाला संसर्गाची शक्यता व्यक्त केली जाते. या स्पर्धेसाठी खेळाडू, प्रशिक्षक, पत्रकार आणि अन्य मिळून साठ हजार लाेक पाहुणे म्हणून येण्याचा अंदाज असल्यामुळे हा धाेका जास्त असल्याचे काेबे विद्यापीठातील संसर्गजन्य राेगांचे तज्ज्ञ केनटाराे इवाटा यांनी सांगितले.जपानमध्ये येणाऱ्यांसाठी ऑलिम्पिक संयाेजन समितीने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पण तरीही जपानच्या 85 टक्के लाेकसंख्येचे अद्याप लसीकरण झाले नसल्याकडे इवाटा हे लक्ष वेधतात.
 
स्पर्धेशी संबंधित असलेले काही लाेक संक्रमित झाले आहेत.मे महिन्यात स्पर्धेची मशाल नेणाऱ्या रिलेमध्ये आठ जणांना संसर्ग झाला हाेता.सुरक्षेचे उपाय केल्यामुळे जपानमधील संक्रमण थांबेल का, असा प्रश्न आराेग्य मंत्रालयातील काेराेना विभागातील तज्ज्ञ हिराेशी निशिउरा यांनी केला आहे. अनेक देशांत काेराेनाचा नवा विषाणू आलेला असताना जपानमध्ये हजाराे लाेकांना येऊ देणे अयाेग्य असल्याचे मत संसर्गराेगतज्ज्ञ हिताेशी ओशितानी यांनी व्यक्त केले आहे.मॅरेथाॅन आणि सर्फिंगसह अन्य स्पर्धा टाेकियाेबाहेर हाेणार असल्यामुळे संसर्ग पसरण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.हजाराे लाेक आल्यानंतर काेराेना प्रतिबंधक उपाय कितपत उपयाेगी पडतील, असा प्रश्नही केला जाताे आहे.‘असाही शिम्बून’ या दैनिकाने गेल्या महिन्यात केलेल्या 1,500 लाेकांच्या सर्वेक्षणानुसार, 62 टक्के लाेकांनी ही स्पर्धा रद्द करावी अथवा स्थगित करावी, असे मत व्यक्त केले हाेते.