मुलांना घेऊ द्या मातृभाषेतून पुस्तके वाचण्याचा आनंद

    21-Jul-2021
Total Views |
 
 
वाचनासारखा सुंदर छंद दुसरा नसावा. काॅम्प्युटर आणि टॅबमुळे सध्याच्या पिढीतील मुलांना वाचनाचे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. इंग्लिशच्या वाढत्या प्रस्थामुळे मुलांचे वाचन त्याच भाषेत जास्त हाेऊ लागल्याचे दिसते. मात्र, मातृभाषासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आणि प्रादेशिक भाषासुद्धा.आता मातृभाषेतून वाचनाचा आग्रह धरला जाताे.त्यामुळे तुमच्या मुलांना मातृभाषेतूनही भरपूर वाचनाचा आनंद घेऊ द्या. हे वाचन त्यांचे जग समृद्ध करेल आणि आपल्या भाषेत किती माेठे साहित्यिक आहेत हेही त्यांना समजेल.
 

Reading_1  H x  
 
संध्यानंद.काॅम
 
काेणत्याही बाह्य साधनांची गरज नसलेला छंद म्हणजे वाचन. आवडत्या विषयाचे पुस्तक घ्यावे आणि निवांतपणे वाचावे यासारखे सुख नाही. पुस्तके तुमच्याकडे काही मागत नाहीत, त्यांना कशाची गरज नसते. जगभरात वाचनप्रेमींची संख्या माेठी आहे. प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या असतील आणि त्यानुसार त्याचे वाचन असेल. आता काॅम्प्युटर आणि टॅबवरही पुस्तके वाचता येतात हा आणखी एक फायदा.मुलांना लहानपणापासून वाचनाचा छंद लावलात तर त्यांचे आयुष्य समृद्ध हाेते.सध्याच्या तरुण पिढीचे वाचन कमी हाेत असल्याची ओरड हाेत असली, तरी ते तसे नाही. त्यांची वाचनाची पद्धत बदलली आहे एवढेच. इंग्लिशच्या वाढत्या महत्त्वामुळे तरुणाईचे वाचन मुख्यत्वे त्या भाषेत हाेते हे खरे असले, तरी मातृभाषासुद्धा तेवढीच महत्त्वाची असते हे विसरून चालणार नाही.
 
भारतासारख्या बहुभाषक देशात प्रादेशिक भाषांमध्ये तेवढेच तुल्यबळ लेखक आहेत हे त्यांची पुस्तके वाचल्यावर कळते. त्यासाठी तुम्हाला ती भाषा येण्याचीसुद्धा गरज नाही. अनुवाद वाचूनही ते समजते.पण त्यासाठी लहानपणापासून वाचनाचा छंद हवा.अगदी लहान असल्यापासून ओश्मा पठारे या मुलीला मराठी पुस्तके वाचण्याची आवड निर्माण झाली. आता ती फक्त सहा वर्षांची आहे. तिची आई रेश्मा या अनुवादिका आणि मीडिया प्राेफेशनल असल्यामुळे ओश्माला मराठी वाचनाची आवड निर्माण झाली.‘मी अगदी लहान असल्यापासून आईने मला माझी मातृभाषा असलेल्या मराठीतून वाचनाची गाेडी मला लावली. आईने मला एका ग्रंथालयाचे सदस्यत्व मिळवून दिले आणि मराठी पुस्तके विकणाऱ्या विक्रेत्यांबराेबर ओळखीही करून दिल्या,’ असे ओश्मा सांगते. तिचे सगळे कुटुंबच वाचनप्रेमी आणि उत्तम ज्ञान पुस्तकांतून मिळविण्यावर विश्वास ठेवणारे आहे. ‘ठक- ठक’पासून सुरू झालेले ओश्माचे वाचन आता मराठीतील प्रख्यात साहित्यिकांच्या पुस्तकांपर्यंत आले आहे.
 
तिच्या आई रेश्मा म्हणतात, ‘आपल्या मातृभाषेतून मिळालेले ज्ञान आणि माहिती आपल्याला जास्त लवकर समजते हे तत्त्व माझ्या आईला माहिती हाेते आणि मराठीतील समृद्ध साहित्याची माहिती माझ्या मुलीला व्हावी अशी माझी इच्छा हाेती.’ ओश्मा चार वर्षांची असताना रेश्मा तिला ‘फ्रँकलिन टर्टल’च्या मालिकांचा मराठी अनुवाद वाचून दाखवित असे. मी तिला ‘इसापनीती’ आणि ‘स्वान बु्नस ऑफ माेरल स्टाेरिज’ (मराठी) ही पुस्तके वाचून दाखवित असताना, ती लक्षपूर्वक ऐकत असायची.मी इंग्लिश पुस्तकांचा मराठीत अनुवाद करत असताना ओश्मा माझ्या शेजारी बसून मराठी कथांचा इंग्लिशमध्ये अनुवाद करते,असे रेश्मा सांगतात. आपले जीवन अधिक अर्थपूर्ण करावयाचे असेल, तर वाचन हा त्यासाठी उत्तम मार्ग आहे.तरुण पिढीसाठी तर ते जास्त महत्त्वाचे असते.पण गॅजेट्सच्या वाढत्या प्रभावामुळे तरुणाईला वाचनाचे माेल लक्षात येत नाही हेही सत्य आहे.
 
त्यात भर पडली आहे ती इंग्लिश भाषेच्या वाढत्या प्रस्थाची. घरात पालक आणि शाळेत शिक्षक असे दाेघेही मुलांना इंग्लिशमधून वाचनाला प्राेत्साहन देताना दिसतात. त्याचा परिणाम म्हणजे, समृद्ध भारतीय भाषांतील साहित्य वाचकांची वाट पाहताना दिसायला लागले आहे.गॅजेट्सचा प्रभाव नसल्याच्या काळात वाचनावर जास्त लक्ष केंद्रित केले जात हाेते. दाेन माणसे भेटल्यावर सहजच नव्या पुस्तकांची चर्चा हाेत असे. पण गॅजेट्समुळे हे प्रमाण घटत चालले असून, मुलांवर त्याचा परिणाम हाेताे आहे.त्यांच्यातील वाचनाची आवड आणि प्रमाण कमी हाेताना दिसते. सध्याच्या काळात वाचनाचा छंद मागे पडल्याचे मत मुंबईतील आदित्य बिर्ला वर्ल्ड अ‍ॅकॅडमीतील ज्युनियर स्कूलच्या प्रमुख साईशा मनसुखानी यांनी व्यक्त केले आहे. ‘सध्याचा काळ अनेक संधींबराेबर अडथळ्यांचासुद्धा आहे.
 
पण यशस्वी जीवन आणि वैयक्तिक उत्कर्षासाठी वाचनाचे महत्त्व कायम आहे. मुलांना हवी असलेली गॅजेट्स देणारे पालक आता वाढले असले, तरी असे पुस्तकांबाबत दिसत नाही.आपल्या मुलांना वाचनाचा छंद लागावा असे वाटत असेल, तर पालकांनी स्वत: त्याचे उदाहरण मुलांसमाेर ठेवायला हवे,’ असे त्या म्हणतात.आपली मुळे कायम ठेवण्यात मातृभाषा माेलाची भूमिका बजावत असल्याचे साईशा मनसुखानी या सांगतात. त्यासाठी मुलांबराेबर मातृभाषेतून अथवा प्रादेशिक भाषांतूनच बाेलायला हवे, असे त्यांना वाटते. त्यांच्या शाळेत लहान वयापासूनच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातात. किंडर गार्टनमधील (केजी) मुलांना वाचनाची गाेडी लागावी म्हणून विविध कार्यक्रम आयाेजित केले जातात. त्याशिवाय मुलांसाठी असलेल्या ‘गेट काॅट रीडिंग’ नावाच्या एका कार्यक्रमात विविध भाषांचा परिचय करून दिला जाताे. शाळा सुरू असण्याच्या काळात ग्रंथालयाचा एक तास असताे आणि त्यात मुलांना प्रादेशिक भाषांतील पुस्तके वाचण्यास प्राेत्साहन दिले जाते, अशी माहिती साईशा मनसुखानी यांनी दिली.
 
टाटा ट्रस्टच्या ‘पराग इनिशिएटिव्ह’ या कार्यक्रमातून बालसाहित्याला आणि वाचनाची आवड निर्माण करण्याला प्राेत्साहन दिले जाते, असे ‘पराग इनिशिएटिव्ह’च्या प्रमुख स्वहा साहू यांनी सांगितले. वाचन म्हणजे केवळ अक्षरओळख नाही. एखादे मूल अक्षरे ओळखते म्हणजे ते वाचन करते असे नाही.उलट मुले वाचताना अडखळत असल्याचे प्रमाण जास्त आहे. भारतात शिक्षणाचे माध्यम प्रामुख्याने प्रादेशिक भाषा असल्यामुळे मुले दाेन भाषा शिकताना गाेंधळतात. त्यांना पाठ्यपुस्तकांशिवाय अन्य चांगली पुस्तके मिळाली, तर ती वाचनात रमायला लागतील, असे त्या म्हणतात.मानसाेपचारतज्ज्ञ आणि ‘एमपाॅवर’चे प्रमुख डाॅ. अंबरिश धर्माधिकारी यांच्या मते, मातृभाषेव्यतिरिक्त आणखी एक भाषा समजणे मुलांसाठी चांगले असते. ते म्हणतात, ‘माेठे हाेईपर्यंत मुले इंग्लिश आणि हिंदी या दाेन भाषा संभाषण आणि अभ्यासासाठी वापरायला शिकलेली असतात. पण मेंदूच्या विकासासाठी मातृभाषा महत्त्वाची असते. अन्य एखादी प्रादेशिक भाषा शिकणेही त्यासाठी उपयुक्त ठरते.’ तीन किंवा त्यापेक्षा जास्त भाषा बाेलू शकणाऱ्या मुलांच्या मेंदूतील ‘ग्रे मॅटर’ वाढत असल्याचे काही संशाेधनांतून दिसले आहे.