मुंबई-पुणे रेल्वे प्रवास आता हाेणार आणखी सुकर

    21-Jul-2021
Total Views |
 
लाेणावळा ते कर्जतदरम्यान नवे बाेगदे : दरड काेसळणे आणि अडथळ्यांवर उपाय याेजणार
 

Railways_1  H x 
 
पावसाळ्यात दरड काेसळण्याच्या घटनांमुळे मुंबई ते पुणे रेल्वे सेवा अनेकदा विस्कळीत हाेते.या मार्गावर पावसाळ्यातील प्रवास सुकर करण्यासाठी माेठ्या प्रमाणात दरड काेसळणाऱ्या ठिकाणी आणखी आठ ते नऊ बाेगदे, तसेच उंच पूल आदी उपाययाेजना करण्यात येणार आहेत.या मार्गावर नव्याने चाैथी मार्गिका हाेणार असून, त्याअंतर्गत या उपाययाेजना असतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. यावर मध्य रेल्वे, रिसर्च डिझाइन स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनकडून (राइट्स) सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सध्या सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात असून, ताे रेल्वे मंडळाकडे मंजुरीसाठीही पाठवला जाणार असल्याचेही मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. कर्जत ते लाेणावळादरम्यानच्या भागाला पावसाचा माेठ्या प्रमाणात फटका बसताे. या पट्ट्यात सर्वाधिक हानी मंकी हिल ते ठाकूरवाडीपर्यंत हाेते. डाेंगरावरून दरड आणि चिखल रुळावर येत असल्याने रुळांना धाेका पाेहाेचण्याबराेबरच सिग्नल यंत्रणेचीही समस्या निर्माण हाेते. या समस्येवर उपाय शाेधण्यात आला आहे. नवीन चाैथ्या मार्गिकेंतर्गत माेठे बाेगदे, तसेच काही उंच पूल तयार केले जाणार आहेत.
 
सध्या कर्जत ते लाेणावळादरम्यान तीन मार्गिका असून, एक अप, दुसरी डाऊन असून, तिसऱ्या मार्गिकेवरून अप व डाऊन दाेन्ही प्रकारच्या रेल्वे जाऊ शकतात. या दरम्यान आणखी एक मार्गिका उभारली जाणार आहे.नव्या मार्गिकेच्या कामासह कर्जत ते लाेणावळादरम्यान ज्या भागात सर्वाधिक दरड काेसळतात त्या मंकी हिल ते ठाकूरवाडी आणि अन्य भागात मिळून आठ ते नऊ बाेगदे तयार केले जाणार आहेत. अडीच ते चार कि.मी. किंवा त्यापेक्षाही जास्त अंतराचे हे बाेगदे असतील. या पट्ट्यात जेथे-जेथे डाेंगराचा भाग संपताे तेथे दरडींचा धाेका टाळता यावा म्हणून गाड्यांना जाण्यासाठी काही उंच पूल उभारण्याचे नियाेजन आहे.
सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. आता सविस्तर प्रकल्प अहवालावर काम सुरू आहे. त्यानंतर अन्य प्रक्रिया पार पाडून रेल्वे बाेर्डाकडेही प्रस्ताव पाठवला जाईल. यात आणखी एक मार्गिका, काही बाेगदे, तसेच पुलांचीही भर पडणार आहे. चाैथ्या मार्गिकेमुळे प्रवासी वाहतूक क्षमताही वाढणार आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.