लसीकरणात पुण्याने ओलांडला 20 लाखांचा टप्पा

    20-Jul-2021
Total Views |
 
 
लसीकरण क्षमतेत महापालिकेकडून वाढ : दाेनशे केंद्रांवर सुविधा उपलब्ध; खासगी रुग्णालयांतही लसीकरण
 

vaccination_1   
 
लसीकरणाच्या बाबतीत पुणे शहराने पुन्हा एकदा आघाडी घेतली. शहराने 20 लाख नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. शहरात 10 जुलैअखेर 20 लाख 37 हजार 182 नागरिकांचे लसीकरण झाले.पुण्याने 28 मे राेजी दहा लाखांचा टप्पा ओलांडल्यानंतर अवघ्या सव्वा महिन्याहून कमी काळात दहा लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात शहराला यश आले आहे.
केंद्राच्या आदेशानुसार 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला केवळ आराेग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. एक मार्चपासून 60 वर्षांपुढील, तसेच 45 वर्षांपुढील गंभीर व्याधी असलेल्या नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. एक मेपासून 18 वर्षांखालील नागरिकांनाही लस देण्यास सुरुवात झाली. 13 मे ते 20 जून या कालावधीत राज्यात 18 ते 44 वयाेगटाचे लसीकरण बंद हाेते.
 
दरम्यानच्या काळात खासगी रुग्णालयांतही लसीकरण सुरू झाले.खासगी रुग्णालयांनी लस उत्पादकांकडून माेठ्या प्रमाणावर लशींची खरेदी केली.सरकारी केंद्रांवर 18 ते 44 वयाेगटाचे माेफत लसीकरण बंद असताना खासगी रुग्णालयांत या वयाेगटासाठीही सशुल्क लसीकरण सुरू झाले आणि लसीकरणाचा वेग वाढला.लशींचा पुरवठा वाढल्यास अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करता यावे, यासाठी महापालिकेनेही लसीकरण क्षमतेत वाढ केली. सध्या शहरात महापालिकेची दाेनशेहून अधिक लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत.लशींच्या उपलब्धतेनुसार या केंद्रांना लस पुरवण्यात येते. कमी प्रमाणात लस उपलब्ध असल्यास महापालिकेची रुग्णालये, दवाखान्यांतील लसीकरण केंद्रांना प्राधान्य दिले जाते.
 
झाेपडपट्ट्यांत लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याचे समाेर आल्यानंतर या घटकांसाठी महापालिकेतर्फे विशेष अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी महापालिकेची पथके झाेपडपट्ट्यांत जाऊन पात्र नागरिकांच्या घराजवळच त्यांचे लसीकरण करत आहेत, तसेच व्हॅक्सिन ऑन व्हील्सच्या माध्यमातून दिव्यांग, तसेच विशेष गरज असलेल्यांचेही लसीकरण केले जात आहे. शिक्षण, नाेकरीसाठी परदेशी जाणारे विद्यार्थी व नागरिकांसाठीही विशेष लसीकरण माेहीम राबवण्यात आली. कंपन्यांत खासगी रुग्णालयांच्या सहकार्याने लसीकरण केले गेले.औद्याेगिक कंपन्यांतही लसीकरण सत्रे आयाेजिण्यात आली हाेती. केंद्र व राज्य सरकारी कार्यालयांत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष माेहीम राबवली गेली. काही साेसायट्यांनीही खासगी रुग्णालयांसह करार करून साेसायट्यांत लसीकरण करून घेतले, अशी माहिती आराेग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.