चीनकडून गेल्या काही वर्षांपासून वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रात माेठ्या प्रमाणात कचरा आणि दूषित पाणी टाकले जात असल्याचे समाेर आले आहे. या कचऱ्यामुळे समुद्रातील शैवालासह सागरी साधनसंपत्ती व समुद्री जीवांना धाेका निर्माण झाला आहे, अशी माहिती अमेरिकेच्या तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.अमेरिकेच्या उपग्रहाकडून मिळालेल्या फाेटाेंमधून चीनचे हे उद्याेग उघडकीला आले आहेत. चीनकडून गेल्या पाच वर्षांपासून शेकडाे जहाजे दक्षिण चीन समुद्रात चालवली जात आहेत. या जहाजांमधून माेठ्या प्रमाणात मानवनिर्मित कचरा आणि दूषित पाणी आणून समुद्राच्या पाण्यात ओतले जात आहे. या सर्वांचे फाेटाे उपग्रहामार्फत घेण्यात आले आहेत. या फाेटाेंचे विश्लेषण सिम्युलॅरिटी इंक या साॅफ्टवेअर कंपनीकडून करण्यात येत आहे, अशी माहिती या कंपनीचे अधिकारी लिझ डेर यांनी दिली. त्यासाठी कृत्रिम बुद्धमत्तेचा वापर केला जात आहे.
चीनची किमान 236 जहाजे दक्षिण चीन समुद्रात 17 जून राेजी दिसली, असे लिझ म्हणाल्या. या समुद्राच्या स्पारटलीज या भागात माेठ्या प्रमाणात कचरा आणि दूषित पाणी या जहाजांमधून फेकले गेले. लिझ यांनी दिलेल्या माहितीवर चीनकडून अद्याप काेणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. चीनसमवेतच व्हिएतनामी सैन्याकडूनही समुद्री जैवविविधतेला धक्का बसत आहे, असा दावा फिलिपिन्सकडून करण्यात आला आहे. चीनच्या कृत्यामुळे समुद्रातील माशांना धाेका निर्माण झाला असून, ट्युनासारख्यामाशाच्या प्रजननावरही परिणाम झाला आहे. या संपूर्ण भागात माशांची संख्याच कमी झाले आहे.दरम्यान, दक्षिण चीन समुद्रात आपण अमेरिकेच्या लढाऊ जहाजांचा पाठलाग केल्याचा दावा चीनच्या लष्कराने केला आहे. फिलिपिन्सने आपसातील संरक्षण कराराचा भंग केल्यास आपण देशावर हल्ला करू, असा इशारा चीनने दिल्यानंतर चीनकडून हा दावा करण्यात आला. अमेरिकेकडून मात्र हा दावा खाेडून काढण्यात आला आहे.