भूजलाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी लाेकसहभाग महत्त्वाचा

19 Jul 2021 12:39:54
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन : भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचा सुवर्ण महाेत्सव
 
 
water Conservation_1 
 
भूजल संपत्ती अतिशय महत्त्वाची असून, तिचे संवर्धन व जतनासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने गेल्या 50 वर्षांत अतिशय महत्त्वाचे काम केले आहे. यापुढेही हे काम अधिक जाेमाने करण्यासाठी या कार्यात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचा सुवर्णमहाेत्सवी वर्धापन दिन कार्यक्रम सह्याद्री अतिथीगृहात झाला. त्या वेळी ते बाेलत हाेते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित हाेते. या वेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसाेडे, विविध आमदार व लाेकप्रतिनिधी, अपर मुख्य सचिव डाॅ. संजय चहांदे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डाॅ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते. सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष आदी माेठ्या संख्येने दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले हाेते.
 
नागरिकांना गुणवत्तापूर्ण पाण्याच्या पुरवठ्यासाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेअंतर्गत राज्यात 183 प्रयाेगशाळा मंजूर आहेत.त्यामधून पाण्याचे नमुने तपासले जातात, गुणवत्तेबाबत काळजी घेण्यात येत आहे. बाटलीबंद पिण्याचे पाणी तपासणे गरजेचे आहे, असे पवार यांनी सांगितले.गुलाबराव पाटील, बनसाेडे व अन्य मान्यवरांनी या वेळी मनाेगत  व्यक्त केले.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, कर्मचारी व वैज्ञानिकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.वरिष्ठ भूवैज्ञानिक चंद्रकांत भाेयर (पुणे), वरिष्ठ खाेदन अभियंता मनाेज सुरडकर (औरंगाबाद) डाॅ. शैलेश कानडे (मुंबई) सहायक रसायनी याेगेश पाच्छापूरकर (नाशिक), सुनील महाजन (औरंगाबाद), शरद कुंजीर, विजय पाटील, व्ही. के.कनिरे, जी. बी. शेख, जे. ए. काेतवाल (सर्व पुणे) यांना प्रातिनिधिक स्वरूपात पुरस्कार प्रदान करण्यात आले. भूजल विभागाची वाटचाल, भूजल विशेषांक, तांत्रिक मार्गदर्शिका, पाऊस पाणी संकलन व भूजल पुनर्भरण या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0