शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्कार प्रदान; ध्येयवेड्या जलमित्रांचा सन्मान : अजित पवार
राज्याच्या कानाकाेपऱ्यात पाणी पाेहाेचवून जलक्रांती घडवू. पाण्याचा विनियाेग चांगल्या पद्धतीने करावा लागेल, हाच जलसाक्षरतेचा अर्थ आहे. शरीरात जसे रक्तवाहिन्यांचे जाळे असते, त्याच पद्धतीने राज्यातल्या कानाकाेपऱ्यात पाणी पाेहाेचवण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला अतिरिक्त ठरणारे, वाहून जाणारे पाणी थांबवावे लागेल. ते वळवावे लागेल. त्यातून जलक्रांती हाेईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.(कै.) डाॅ. शंकरराव चव्हाण यांच्या 101व्या जयंतीनिमित्त जलसंपदा, जलसंधारण व पाणीपुरवठा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या डाॅ.शंकररावजी चव्हाण जलभूषण पुरस्कार वितरणप्रसंगी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बाेलत हाेते. उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री अशाेक चव्हाण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात, ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसाेडे उपस्थित हाेते.
जलक्रांतीचे कार्य पुढे नेणाऱ्या ध्येयवेड्या जलमित्रांचा हा सन्मान आहे. जलक्रांतीची चळवळ झपाट्याने नागरिकांपर्यंत पाेहाेचवून त्यास लाेकचळवळीचे स्वरूप येवाे, असे पवार यांनी सांगितले. जलसंपदा विभागामार्फत हा पुरस्कार देण्यात येत असल्याबद्दल अशाेक चव्हाण यांनी विभागाचे आभार मानले. जयंत पाटील यांनीही मनाेगत व्यक्त केले.प्रथम पुरस्कार विजेते (कै.) सुनील पाेटे (नाशिक), द्वितीय पुरस्कार अनिकेत लाेहिया (अंबाजाेगाई), तर तृतीय पुरस्कार प्रवीण महाजन (नागपूर) यांना मिळाला आहे. अनुक्रमे पाच लाख, तीन लाख व दाेन लाख रुपये, स्मृतिचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.(कै.) सुनील पाेटे यांचा पुरस्कार त्यांच्या पत्नी मनीषा पाेटे यांनी स्वीकारला. पाेटे यांनी पुरस्कारार्थ्यांच्या वतीने मनाेगत व्यक्त केले.