वीजयंत्रणेजवळ नागरिकांनी कचरा जाळू नये

07 May 2021 19:55:52
 
महावितरणचे आवाहन : वीजपुरवठा खंडित हाेण्याचे वाढते प्रकार
 

fire_1  H x W:  
सध्या उन्हाचा तडाखा सुरू असल्याने शहरी व ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी किंवा घरे, इमारतींच्या परिसरात असलेल्या वीजयंत्रणेजवळ सुका व ओला कचरा टाकल्यामुळे किंवा कचऱ्याने पेट घेतल्यामुळे वीजयंत्रणेला धाेका निर्माण हाेत आहे. नागरिकांनी वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू किंवा जाळू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पिलर, राेहित्र, डिस्ट्रीब्युशन बाॅक्स, डीपी आदी वीजयंत्रणेजवळील जागेत घरातील सुका व ओला कचरा टाकला जात असल्याचे दिसून येत आहे. हा कचरा पेटवल्याने किंवा इतर कारणांमुळे कचरा जळाल्याने जवळच असलेल्या विजेच्या भूमिगत केबल व इतर यंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. साेबतच या यंत्रणेला आग लागण्याची शक्यता आहे. वीजयंत्रणेला आग लागल्याने किंवा नादुरुस्त झाल्यामुळे वीजपुरवठाही खंडित हाेण्याचे प्रकार दिसून येत आहेत.
 
सध्या अनेक ठिकाणी वीजयंत्रणेजवळ टाकलेला कचरा पेटवून देण्याचे किंवा त्यात आग लागण्याचे प्रकार वाढत आहेत. ओव्हरहेड तारांखाली असलेल्या कचऱ्याचा ढिगारा पेटवल्यामुळे किंवा त्यास आग लागल्यामुळे तारा वितळून वीजपुरवठा खंडित हाेण्याचा धाेका आहे. महावितरणने सार्वजनिक ठिकाणी असलेल्या राेहित्रांना संरक्षक जाळ्या, कपाऊंड लावलेले आहे. परंतु, अनेक ठिकाणी कंपाऊंडच्या आत कचरा व शिळे खाद्यपदार्थ टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. खाद्यपदार्थांमुळे मांजर, उंदीर, घुशी, पक्षी आदींसह सरपटणारे प्राणी तेथे येतात आणि वीजयंत्रणेच्या संपर्कात आल्यावर शाॅर्टसर्किट हाेऊन वीजपुरवठा खंडित हाेताे. प्राण्याचा नाहक जीव जाण्याचेही प्रकार घडले आहेत. वीजयंत्रणेला आग लागल्याचे किंवा संभाव्य धाेका असल्याचे दिसताच 1912 किंवा 18001023435 किंवा 18002333435 या टाेल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहनही महावितरणने केले आहे.
Powered By Sangraha 9.0