वाळवंटी भाग आणि त्यातून उन्हाळा म्हणजे पाणीसाठा स्थिती काय असेल याची कल्पना केलेली बरी. पण, पश्चिम अरिझाेना भागात पाणीसाठे शाेधण्यासाठी चक्क गाढवांचा वापर केला जात असून, त्याचा फायदा प्राणी, पक्षी आणि माणसांना हाेताे आहे. गेली हजाराे वर्षे घाेडे आणि गाढवे माणसांचे मित्र म्हणून उपयाेगी पडत आहेत. आता अरिझाेनामध्ये या गाढवांचा वापर छाेटे पाणवठे खणून काढण्यास केला जाताे आहे. याबाबतचे संशाेधन जीवशास्त्रज्ञ एरिक लुंडग्रीन यांनी केले आहे. त्यांचा शाेधनिबंध युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नाॅलाॅजी ऑस्ट्रेलियाच्या मासिकात प्रसिद्ध झाला आहे. आफ्रिकेत अशा प्रकारे हत्तींचा वापर विहिरी खणण्यासाठी केला जाताे. इन्व्हेजन बायाेलाॅजी हे नवे क्षेत्र त्यातून अभ्यासकांना उपलब्ध झाले आहे. नैसर्गिक पाणवठ्यांप्रमाणे गाढवे आणि घाेडे यांनी खणून तयार केलेले पाणीसाठे अधिक उपयाेगात येत आहेत, असे दिसून आले.