ऑपरेशन समुद्र सेतू-2 साठी युद्धनाैका रवाना; आयएनएस जलाश्व बँकाॅककडे

    03-May-2021
Total Views |
 
काेराेनाविराेधातील लढ्यासाठी नाैदलाने कसली कंबर
 

ship_1  H x W:  
 
देशात काेराेनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट हाेत आहे. काही राज्यांत रुग्णवाढीचा वेग इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांना काेराेना रुग्णांवर उपचार करण्यात माेठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आता नाैदलाने काेराेनाविराेधातील लढ्यासाठी कंबर कसली आहे. भारताच्या काेराेनाविराेधी लढ्याला मदत म्हणून आता नाैदलाने ऑपरेशन समुद्र सेतू-2 या माेहिमेला सुरुवात केली आहे. या माेहिमेत इतर देशांतून समुद्रमार्गे ऑक्सिजन देशात आणण्यासाठी नाैदलाने सुरुवात केली आहे. नाैदलाने आयएनएस काेलकाता, आयएनएस तलवार, आयएनएस जलाश्व आणि आयएनएस ऐरावत या युद्धनाैका देशाची ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी या माेहिमेत उतरवल्या आहेत. देशात सध्या ऑक्सिजन एक्स्प्रेस माेहीम सुरू असून, या माेहिमेला हातभार म्हणून नाैदलाने ऑपरेशन समुद्र सेतू-2 माेहीम सुरू केली आहे.
  
देशाच्या काेराेनाविराेधी लढ्याला मदतीसाठी युद्धनाैका इतर देशांतून ऑक्सिजनचे कंटेनर आणि इतर वैद्यकीय उपकरणे देशात आणतील, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी एका ट्विटद्वारे दिली आहे. या युद्धनाैकांपैकी आयएनएस काेलकाता आणि आयएनएस तलवार सध्या बहारिनची राजधानी मनामा बंदरात असून, त्या लवकरच मुंबईत 40 टन लिक्विड ऑक्सिजनचे कंटेनर्स आणणार आहेत. याचप्रकारे ऑक्सिजन आणण्यासाठी आयएनएस जलाश्व बँकाॅककडे, तर आयएनएस ऐरावत सिंगापूरकडे रवाना झाल्याची माहितीही राजनाथसिंह यांनी या ट्विटमधून दिली. गेल्या वर्षी नाैदलाने अशाच प्रकारे वंदे भारत मिशनचा एक भाग म्हणून ऑपरेशन समुद्र सेतूला सुरुवात केली हाेती. त्या वेळी मालदीव, श्रीलंका आणि इराणमध्ये अडकलेल्या सुमारे 3992 नागरिकांना नाैदलाने पुन्हा देशात सुखरूप आणले हाेते.