बाैद्धसंस्कृतीचा अनमाेल ठेवा ठरणार पुढील पिढ्यांसाठी दिशादर्शक
जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांच्या शाेधाला नुकतीच 202 वर्षे पूर्ण झाली आहेत. या लेण्यांकडे आज अवघे जग आकर्षित हाेत आहे. बाैद्धसंस्कृती जगाला सांगणारा हा ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. या लेण्यांचा शाेध 28 एप्रिल 1819 राेजी जाॅन स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्याने लावला. या लेण्यांच्या शाेधामागची कहाणीही माेठी रंजक आहे. ब्रिटिश सैन्याची एक तुकडी शिकारीच्या शाेधात अजिंठा लेण्यांच्या परिसरातील जंगलात फिरत हाेती. त्यावेळी शिकारीच्या मागावर असलेल्या जाॅन स्मिथ यांना एक वाघ जंगलातील गुहेत जाताना दिसला. तेव्हा स्मिथही त्याच्या मागाेमाग त्या गुहेत गेले असता, गुहेतील कलात्मक साैंदर्य पाहून त्यांन आश्चर्याचा धक्का बसला. हजाराे वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या मानवी संस्कृतीचा हा अनमाेल ठेवा हाेता. त्यानंतर स्मिथ यांनी या लेण्यांतील लेणी क्रमांक 10च्या खांबावर आपले नाव आणि तारीख लिहिल्याचे अस्पष्ट पाहायला मिळते.
स्मिथ यांच्या शाेधानंतरही या ठिकाणी काही काम झाले नाही. फक्त कंपनीच्या सरकार दरबारी नाेंद, अभ्यास आणि अहवाल तयार झाले. पुढे 1844 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनेकॅप्टन राॅबर्ट गिल या चित्रकलाप्रेमीची लेण्यांच्या संरक्षणासाठी नेमणूक केली. गिल स्वतः चित्रकार हाेते. त्यांनी येथील झाडे-झुडपे ताेडली. लेण्यांची, परिसराची स्वच्छता केली. लेण्यांकडे जाण्यासाठी रस्ता केला. त्यामुळे बाैद्ध धर्माचा देदिप्यमान ठेवा जगासमाेर आला. गिल यांनी येथील चित्रांच्या प्रतिकृती स्वत: काढल्या. अजिंठ्यावरचा दुर्मीळ असा चित्रग्रंथ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयात अभ्यासासाठी आजही उपलब्ध आहे. अशाप्रकारे एक माैलिक ठेवा जगाच्या समाेर आला. त्याला आता 202 वर्षे पूर्ण झाली आहेत.