गुरु बहुतांशी माये। परि एकलाैति हाेऊनि ठाये।
तैसें करूनि आण वाये। कृपे तिये ।। 13.410
गुरू ही आपली माउली समजून शिष्य किती प्रेम करताे याचे वर्णन ज्ञानेश्वर करीत आहेत. प्रेमाच्या भरात ताे गुरूला क्षीरसमुद्र म्हणताे.त्याला शेषाची गादी अर्पण करताे. त्याच्या पायांची सेवा करण्यासाठी म्हणून आपण लक्ष्मी हाेताे. आपणच गरुड हाेऊन ताे नम्रतेने पुढे उभा राहताे. कधी ताे गुरूला आई मानून तिच्या मांडीवर आनंदाने लाेळताे.गुरूला गाय मानून आपण तिच्या मागे वासरू हाेताे. गुरूच्या प्रेमजलात ताे मासाेळी बनताे. डाेळे उघडले नाहीत, पंख फुटले नाहीत, असे पक्ष्याचे पिल्लू आपणच हाेऊन ताे गुरुकडे पाहताे. ताे नेहमी म्हणत असताे की, मी गुरूची सेवा चांगली करीन, मग ते मला आशीर्वाद देतील. तेव्हा मी त्यांना सांगेन की, हा जाे तुमचा सर्व परिवार आहे, ताे सर्व माझ्या रूपानेच व्हावा.
आपल्या पूजेची उपकरणी मीच व्हावीत. या विनंतीस रुकार दिल्यावर मी गुरूचा सर्व परिवार हाेईन. गुरूच्या पूजेला उपयाेगी पडणाऱ्या सर्व वस्तू मीच हाेईन हे श्रीगुरू पुष्कळांची आई आहेत, पण हे माझी एकट्याचीच आई व्हावेत असे समजून मी त्यांच्याकडून तशी शपथ घेववीन. श्रीगुरूच्या प्रेमाला माझा छंद लावीन. त्यांच्या प्रेमाकडून एकपत्निव्रत घेववीन. ते मला साेडून जाणार नाहीत असा उपाय मी करीन.वारा कितीही धावला तरी चार दिशांच्या बाहेर कसा जाईल ? त्याप्रमाणे गुरूची कृपा हाच एक पिंजरा समजून मी त्यात सुखाने राहीन. गुरूसेवा ही माझी मालकीण हाेईल. तिला मी गुणांचे अलंकार करीन. त्यांच्या स्नेहरूपी वृष्टीला मी खाली पृथ्वी हाेईन. श्रीगुरूंचे राहते घर मी स्वत:च हाेईन व तेथील चाकरही मीच हाेऊन चाकरी करीन. गुरूच्या घराचे उंबरे मीच हाेईन व त्यांच्यावरून गुरूंची ये-जा हाेईल.