मागणीनुसार पश्चिम रेल्वे देणार आयसाेलेशन काेच

    14-Apr-2021
Total Views |
आवश्यकतेनुसार राज्यांना मदत करण्यासाठी पुढाकार, 386 काेच उपलब्ध
 
d_1  H x W: 0 x
 
मुंबई, 13 एप्रिल (आ.प्र.) : देशात सध्या काेराेनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकार व प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. अनेक ठिकाणी लाॅकडाऊनसह निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत, परंतु तरीही दिवसेंदिवस वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता रुग्णालयांतील खाटा अपुऱ्या पडत आहेत.परिणामी, रुग्णांचे हाल हाेत असल्याने सरकारी यंत्रणांकडून शक्य त्या अन्य उपायांचाही विचार केला जात आहे.दरम्यान, काेराेनाविरुद्धच्या या लढ्यात आता रेल्वेनेही पुढाकार घेतला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ज्या राज्यांकडे आयसाेलेशन खाटा उपलब्ध नसतील, त्यांच्यासाठी आता रेल्वेने आयसाेलेशन काेच उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे.पश्चिम रेल्वेकडे 386 आयसाेलेशन काेच उपलब्ध असून, त्यांपैकी 128 काेच मुंबई विभागात आहेत. एखाद्या राज्याने या आयसाेलेशन काेचची मागणी नाेंदवल्यास हे काेच त्यांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यास तयार असतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी संजय भाकर यांनी दिली.या प्रत्येक काेचमध्ये आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा असून, एका काेचमध्ये सुमारे 24 रुग्णांची साेय हाेऊ शकते. या सर्व काेचमध्ये मिळून एकाचवेळी 3600 रुग्णांची व्यवस्था केली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फाेर्ससाेबत घेतलेल्या बैठकीतही नंदुरबार येथे रेल्वेला विनंती केल्याने रेल्वे बाेगीत आयसाेलेशन बेड्स व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आराेग्य प्रधान सचिव डाॅ. प्रदीप व्यास यांनी दिली.