बारावीची मे अखेरीस, तर दहावीची परीक्षा जूनमध्ये

    14-Apr-2021
Total Views |
राज्य सरकारचा निर्णय : बाेर्ड जाहीर करणार सुधारित वेळापत्रक
 
x_1  H x W: 0 x
 
मुंबई, 13 एप्रिल (आ.प्र.) : काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी व पालकांत निर्माण झालेले तणावाचे वातावरण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांचे हित लक्षात घेता दहावी आणि बारावीच्या नियाेजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता बारावीच्या परीक्षा मेच्या शेवटच्या आठवड्यात, तर दहावीच्या परीक्षा जूनमध्ये घेण्याबाबतचे नियाेजन करावे. त्यादृष्टीने परिपूर्ण तयारी करावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या बदलाबाबत इतर परीक्षा मंडळांना माहिती दिली जावी, तसेच सुधारित नियाेजनानुसार पुढील वेळापत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जाहीर केले जावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाची बैठक घेण्यात आली. त्यात ते बाेलत हाेते. यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री बच्चू कडू, मुख्य सचिव सीताराम कुंटे, शालेश शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, माध्यमिक व उच्च माध्यमिक बाेर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील, राजेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित हाेते.बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढे आयआयटी जेईई आणि नीटच्या परीक्षा देऊन इतर उच्च शिक्षण अभ्यासक्रमांत प्रवेश घ्यावयाचे असतात. त्यांचे नुकसान हाेणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेतील सर्व कर्मचारी-अधिकारी आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे. याची एक परिपूर्ण आणि सुनियाेजित कार्यप्रणाली (एसओपी) शालेय शिक्षण विभागाने निश्चित करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.