रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी भरारी पथक

    14-Apr-2021
Total Views |
पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली कार्यवाही
 
d_1  H x W: 0 x
 
पुणे, 13 एप्रिल (आ.प्र.) : रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा व वितरण सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पुणे जिल्ह्यात भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी काेणतीही आपत्ती राेखण्यासाठी किंवा प्रतिबंधात्मक उपाययाेजना करण्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा व वितरण सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व या इंजेक्शनचा तुटवडा जिल्ह्यात भासू नये, यासाठी भरारी पथकाची नियुक्ती केली आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपरिषदा व छावणी परिषद हद्दीत या भरारी पथकाला काम करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. 31 मेपर्यंतच्या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नियंत्रण कक्षातून प्राप्त हाेणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने, तसेच तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी आणि अन्न व औषध विभागात समन्वय साधायचा आहे.जिल्ह्यात रेमडेसिवीरबाबत येणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित ठिकाणी असलेले औषध विक्रेते, रुग्णालयात जाऊन तक्रारीची पडताळणी हे पथक करणार आहे. या पथकास आवश्यकतेनुसार अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पाेलिसांना मदत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील काेविड रुग्णालयांद्वारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा याेग्य वापर करण्यात येत आहे किंवा नाही याबाबत तपासणी करून कार्यवाही करावी. याबाबत दाेन्ही महापालिका आणि जिल्हा आराेग्य अधिकाऱ्यांनी या पथकात तज्ज्ञांची तात्काळ नियुक्ती करावी, तसेच या पथकाच्या कामकाजाचा अहवाल तात्काळ नियंत्रण कक्षास सादर करावा, असे निर्देशही जिल्हाधिऱ्यांनी दिले आहेत.