यंदा रक्तदान उपक्रमातून हाेणार नववर्षाचे स्वागत

    13-Apr-2021
Total Views |
सामाजिक बांधिलकी जपण्याचा ठाणे, डाेंबिवलीत प्रयत्न : नागरिकांना लसीकरणाचे आवाहन
 
dc_1  H x W: 0
 
ठाणे, 12 एप्रिल (आ.प्र.) : ठाणे जिल्ह्यात मराठी नववर्षानिमित्त निघणाऱ्या स्वागत यात्रा गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही काेराेनामुळे रद्द झाल्या आहेत. यात्रा रद्द हाेत असल्या, तरी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी संस्थाचालकांनी पुढाकार घेतला आहे. राज्यात मेमध्ये दरवर्षीच रक्ताचा तुटवडा निर्माण हाेताे. यंदा लसीकरण माेहीम सुरू असल्याने रक्तदात्यांचे प्रमाणही काही प्रमाणात घटले आहे. हे लक्षात घेऊन ठाणे, डाेंबिवली, तसेच आसपासच्या स्वागत यात्रा आयाेजकांनी नववर्षानिमित्त रक्तदानाचे उपक्रम हाती घेतले आहेत.
याशिवाय काेराेना प्रतिबंधक लसीकरणासाठी जनजागृतीचे प्रयत्नही केले जात असून, यासाठी माेठ्या प्रमाणावर समाजमाध्यमांचा उपयाेग केला जात आहे.दरवर्षी मराठी नववर्षानिमित्त जिल्ह्यात स्वागत यात्रा काढल्या जातात. त्यापैकी ठाणे आणि डाेंबिवलीत माेठ्या स्वागत यात्रा निघतात. वर्षानुवर्षे या स्वागत यात्रांमधून मुलांपासून ते ज्येष्ठापर्यंत सर्व वयाेगटांतील नागरिक माेठ्या संख्येने सहभागी हाेत असतात. या स्वागत यात्रांच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश देण्यात येतात. तसेच, वेगवेगळ्या संकल्पना घेऊन या यात्रेचे आयाेजन करण्यात येत असते.यासाठी आयाेजक चार ते पाच महिने आधीपासून तयारीला लागतात. गेल्या वर्षी या स्वागत यात्रेची आयाेजकांकडून माेठ्या उत्साहात तयारी करण्यात आली हाेती.मात्र, मार्चमध्ये पसरलेल्या काेराेनामुळे आयाेजकांना स्वागत यात्रा रद्द करावी लागली हाेती. तसेच, यावर्षीही काेराेनाचे संकट कायम असल्यामुळे स्वागत यात्रेविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ हाेत असल्याने आयाेजकांनी यंदाही स्वागत यात्रा रद्द केली आहे. रक्तदान, लसीकरण, तसेच काेराेनाविषयक जनजागृतीचे आवाहन करण्यात आले आहे.राज्यात रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. ठाण्यातील श्री काैपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे स्वागत यात्रा काढण्यात येते.काेराेनामुळे आयाेजकांकडून स्वागत यात्रा रद्द करण्यात आली आहे. मात्र, स्वागत यात्रेत खंड पडत असला तरी सामाजिक बांधिलकी म्हणून या संस्थाचालकांनी यंदा नववर्षानिमित्त नागरिकांत रक्तदानाविषयी जनजागृती करण्याचे ठरवले आहे. यासाठी गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत ठाण्यातील (कै.) वामनराव ओक रक्तपेढीत नागरिकांनी जाऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयाेजकांनी केले आहे. डाेंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानचाही अशाच प्रकारचा उपक्रम आयाेजिण्याचे प्रयत्न सुरू आहेत.