रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर टाळावा

    10-Apr-2021
Total Views |
राजेश टाेपे यांची सूचना : प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक
 
x_1  H x W: 0 x
 
राज्यात जाणवणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी या इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या सात कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्याला रेमडेसिवीरची कमतरता भासू नये, यासाठी उत्पादन दुप्पट करावे. रुग्णालयांत रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक नेमतानाच उत्पादक कंपन्यांनी थेट शासकीय रुग्णालये आणि जिल्हाधिकाऱ्यांना इंजेक्शनचा पुरवठा करावा. काळा बाजार हाेऊ नये म्हणून त्याची एमआरपी कमी करावी, अशा सूचना टाेपे यांनी केल्या.अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे, आराेग्य विभागाचे प्रधान सचिव डाॅ. प्रदीप व्यास, आयुक्त डाॅ. रामास्वामी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे, राज्य आराेग्य सेवा साेसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुधाकर शिंदे यांच्यासह सिप्ला, झायडस, हेट्राे, डाॅ. रेड्डी, सन फार्मा, ज्युबिलियंट या कंपन्यांचे प्रमुख अधिकारी आणि इंडियन फार्मास्युटिकल्स असाेसिएशनचे पदाधिकारी उपस्थित हाेते.राज्याला सध्या राेज 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा हाेत आहे. सध्याची वाढती रुग्णसंख्या पाहता एप्रिलअखेर दिवसाला किमान दीड लाख इंजेक्शनची आवश्यकता भासू शकते.त्यासाठी उत्पादन दुप्पट करावे. कंपन्यांनी वाढीव उत्पादनाला सुरूवात केली असून, त्याची प्रक्रिया पूर्ण हाेऊन नवीन उत्पादन यायला किमान 20 दिवस लागतील.त्यानंतर राज्यात त्याचा तुटवडा जाणवणार नाही, असे टाेपे यांनी सांगितले.इंजेक्शनवरील छापील एमआरपी कमी करावी, अशी सूचना आराेग्यमंत्र्यांनी यावेळी केली. राज्यात कुठेही 1100 ते 1400 रुपये या किमतीत रेमडेसिवीर मिळाले पाहिजे, असे सांगतानाच डाॅ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती या कंपन्यांशी चर्चा करून इंजेक्शनची किंमत निश्चित करेल, असे टाेपे यांनी सांगितले.