काेकीळ पक्षी आपले घरटे कधीच बांधत नाही

    01-Apr-2021
Total Views |

sd_1  H x W: 0  
 
वसंत आला की, काेकिळेचा सुमधुर आवाज कानावर पडू लागताे. चैत्रपालवी फुटलेल्या झाडांवर बसून काेकिळेची सकाळ-संध्याकाळ गाण्याची मैफल सुरू असते. कुहू कुहू असा आवाज करीत सर्वांना भुरळ घालणारा पक्षी म्हणजे काेकीळ पक्षी. या पक्ष्याला जंगलात किंवा माेठमाेठ्या झाडांवर राहायला आवडते.नर पक्षी हा दिसायला कावळ्यासारखा असताे. याचे डाेळे लालसर तपकिरी रंगाचे असतात. या डाेळ्यांमुळे हा काेकीळ पक्षी ओळखला जाताे.मादी ही काेकिळा काळ्या रंगाचीच असते; परंतु तिच्यावर पांढरे ठिपके असतात. यामुळे नर व मादी ओळखायला येतात. या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळा व हिवाळा या ऋतूंमध्ये या पक्ष्याला कंठ फुटलेला नसताे. हा पक्षी त्यावेळी फक्त खाणे आणि जगणे एवढंच करताे. हा पक्षी त्यावेळी अतिशय शांत असताे. उन्हाळ्याचा प्रारंभ हा नर व मादीच्या मिलनाचा असताे. त्यामुळे या दरम्यान नर व मादी एकमेकांना आकर्षित करण्यासाठी कुहू कुहू असा आवाज काढत माेठमाेठ्याने ओरडत असतात. हा आवाज सर्वांनाच माेहून टाकताे. सुरुवातीला हा पक्षी खालच्या आवाजात मंजुळ स्वरात ओरडत असताे. हळूहळू ताे वरच्या स्वरात ओरडू लागताे. या पक्ष्याच्या अंगी चांगल्या आवाजाचा गुण आहे; तसेच काही वाईट गुणही आहेत.सर्वच पक्षी आपले घरटे बांधत असतात; परंतु काेकीळ पक्षी आपले घरटे कधीच बांधत नाही. ताे सदैव झाडाझुडपात वावरत असताे. यातील मादी पक्षी आपली अंडी दुसऱ्याच्या घरट्यात घालते, त्यामुळे आपल्या पिल्लांना वाढविण्याची जबाबदारीही घेत नाही. याबाबतीत ती अतिशय आळशी असते. काेकिळेच्या अंड्यांचा रंग हा कावळ्याच्या अंड्यांच्या रंगाप्रमाणे असल्यामुळे ती आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात टाकते.ही अंडी फिकट तांबूस रंगाची व तांबूस तपकिरी ठिपक्यांची असतात. हाच रंग कावळ्याच्याही अंड्यांचा असताे. त्या घरट्यात आधीच कावळ्याची अंडी असतील, तर ती मादी त्या कावळ्याची अंडी चाेचीने फोडून बाहेर भिरकावून देते.