आरटीई अंतर्गत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू

    04-Mar-2021
Total Views |
याेजनेचा लाभ घेण्याचे ठाण्याचे महापाैर म्हस्के, आयुक्तांचे पालकांना आवाहन
 
स,_1  H x W: 0
 
ठाणे, 3 मार्च (आ.प्र.) : महापालिका कार्यक्षेत्रातील कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्य संचलित शाळांत बालकांचा माेफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) अन्वये 25 टक्के राखीव असलेल्या जागांसाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रवेशप्रक्रिया राज्यस्तरावरून ऑनलाइन पद्धतीने हाेणार असून, पालकांनी पाल्यांचे अर्ज ऑनलाइन सादर करावयाचे आहेत.ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत दि.3 ते 21 मार्च अशी असून, हे अर्ज www. student.maharashatra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध हाेणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.शासनाच्या धाेरणानुसार महापालिका कार्यक्षेत्रातील शाळांत आरटीई अंतर्गत शाळेच्या प्रवेशस्तरावरील वर्गातील प्रवेश क्षमतेच्या 25 टक्के आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. 2021-22 साठी ही प्रवेशप्रक्रिया 3 मार्चपासून सुरू हाेणार असून, इच्छुक पालकांनी आरटीई पाेर्टलवरून आपल्या पाल्यांचे अर्ज सादर करावयाचे आहेत. हे अर्ज सादर करताना या साेबत सक्षम निवासी पुरावा, वंचित गटातील विद्यार्थ्यांसाठी वडिलांचे जात प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल गटातील, एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी 1 लाखाच्या आतील उत्पन्न असल्यास उत्पन्नाचा दाखला, जन्मदाखला, तसेच दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा व जातीचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरला जाणार नाही, असे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी नमूद केले.नर्सरी, ज्युनियर केजी व पहिलीसाठी ही प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येणार असून, संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने हाेणार आहे. चुकीची माहिती भरून प्रवेश घेतल्याचे आढळून आल्यास संबंधित प्रवेश रद्द करण्यात येतील. लाॅटरी पद्धतीने शाळेत पाल्याची निवड झाल्यानंतर अर्ज भरताना जी कागदपत्रे सादर केली असतील, त्याच्या पडताळणीसाठी व प्रवेश निश्चितीसाठी अलाॅटमेंट लेटरवर दिलेल्या पडताळणी केंद्रावर पालकांना जाणे अनिवार्य असेल. जास्तीत जास्त पालकांनी या याेजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापाैर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांनी केले आहे.