मुंबईत रुग्णालये, माॅलची पुन्हा झाडाझडती

    31-Mar-2021
Total Views |
 
c_1  H x W: 0 x
 
मुंबई, 30 मार्च (आ.प्र.) : मुंबईतील ड्रीम्स माॅलला लागलेल्या भीषण आगीमुळे सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने शहरातील सर्व रुग्णालये, नर्सिंग हाेम आणि माॅलचे पुन्हा फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यात 1109 रुग्णालये, नर्सिंग हाेम आणि 71 माॅलची झाडाझडती घेतली जाणार आहे. पालिकेने याआधी केलेल्या सर्वेक्षणात 250 रुग्णालये आणि 29 माॅलमध्ये अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन हाेत नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला हाेता. भांडुपमधील ड्रीम्स माॅलला नुकत्याच लागलेल्या आगीत माॅलमधील सनराइज काेराेना रुग्णालयातील 11 रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला. घटनास्थळाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व रुग्णालये आणि काेराेना केंद्रांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश दिले हाेते. त्यानंतर महापालिका व अग्निशमन दलाने पाहणी, तपासणी माेहीम सुरू केली आहे.ड्रीम्स माॅलला पालिकेच्या अग्निशमन दलाने अग्निसुरक्षा नसल्यामुळे नाेटीस बजावली हाेती. मात्र, माॅलने अग्निसुरक्षा यंत्रणा उभारली नसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बेजबाबदार आस्थापनांमुळे नागरिकांच्या जीवाला धाेका निर्माण हाेत असल्याने पालिकेने कठाेर कारवाईची पावले उचलण्याचे ठरवले आहे. काेराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुंबईतील अनेक हाॅटेल, माेठी सभागृहं, इमारती किंवा वास्तूंमध्ये तात्पुरत्या स्वरूपात काेराेना रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. ड्रीम्स माॅलमध्ये लागलेल्या आगीनंतर पालिकेने आपल्या सर्व काेराेना केंद्रांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.