पश्चिम रेल्वेवर 15 डब्यांच्या 24 लाेकल फेऱ्या

    03-Mar-2021
Total Views |
 
xc_1  H x W: 0
 
मुंबई, 2 मार्च (आ.प्र.) : पश्चिम रेल्वेवरील अंधेरी ते विरार धिम्या मार्गावर 15 डब्यांच्या लाेकल प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, मार्चपासून या मार्गावर 15 डब्यांच्या 24 फेऱ्या चालवण्याचा विचार रेल्वे प्रशासन करते आहे.पश्चिम रेल्वेच्या अंधेरी ते विरार पट्ट्यात प्रवाशांची संख्या अधिक आहे. अंधेरी, बाेरिवली, भाईंदर, मिरा राेड, विरार स्थानकांत प्रवासी संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी गर्दीतील प्रवास जीवघेणा ठरताे. हा प्रवास सुकर करण्यासाठी अंधेरी ते विरार दरम्यान धिम्या मार्गावरही 15 डब्यांची लाेकल चालवण्याचे नियाेजन करण्यात आले आहे.हा प्रकल्प गेल्या वर्षी जानेवारीत पूर्ण केला जाणार हाेता. परंतु, अंधेरी, जाेगेश्वरी, भाईंदर, वसई, विरार येथील काही तांत्रिक कामांत आलेल्या अडथळ्यांमुळे हा प्रकल्प एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले हाेते.त्यानुसार कामाला गती दिली जात असताना मार्चमध्ये टाळेबंदी सुरू झाल्याने सुरुवातीचे तीन महिने काही प्रमाणात काम रखडले. त्यानंतर कामाला काहीशी गती देण्यात आली. प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, आता याच मार्गावर 15 डब्यांच्या 24 लाेकल फेऱ्या सुरू करण्याचे नियाेजन आहे.सध्या 15 डब्यांच्या 54 लाेकल फेऱ्या चर्चगेट ते विरार, डहाणू स्थानकांदरम्यान धावतात. साधारण वर्षभरात 15 डब्यांच्या एकूण लाेकल फेऱ्यांची संख्या 146 पर्यंत नेण्याचे पश्चिम रेल्वेचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे प्रवासी क्षमता वाढेल आणि लाेकल प्रवासही सुकर हाेण्यास मदत मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.