जीवनाची अहंकाररहित अवस्था ही मानवता निर्मितीची अवस्था असते, असे म्हटले तर वावगे हाेणार नाही. नाशवंत अशा सत्ता, संपत्ती, साैंदर्य आणि शरीरावर बाळगलेल्या अहंकारामुळे अनेकांना कालांतराने का हाेईना अत्यंत दु:खाने काळाच्या अधीन व्हावे लागल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमाेर आहेत. नाशवंत सत्ता, संपत्ती, साैंदर्य, शरीराचा अभिमान न बाळगणारे काळाच्या अधीन हाेत नाहीत असे नव्हे. पण असे अनेक लाेक हसतमुखाने काळाच्या स्वाधीन हाेतात.
त्यांना सत्ता, संपत्ती, साैंदर्य, शरीर आदिच्या नाशाचे वाईट वाटत नाही. कारण त्यांनी यावर अभिमानच बाळगलेला नसताे. हे लाेक मानाची अपेक्षाही करीत नाहीत. त्यामुळे पावलाेपावली यांना आपाेआप आनंदाची प्राप्ती हाेते. अयाेग्य किंवा चुकीचे कांहीच यांच्याकडून घडत नाही. म्हणून हे लाेक कर्तव्य पार पाडतांना तसेच निस्वार्थ प्रेम जाेपासतांना कसल्याही प्रकारची लाज बाळगत नाहीत. खऱ्या प्रेमात अभिमानाला, मानाला, लाजेला स्थानच नसते. असे प्रेम आपल्याकडून सर्व जीवमात्राच्या बाबतीत घडाे, हीच ज्ञानाेबा तुकाेबा चरणी प्रार्थना. निस्वार्थ प्रेमाची ताकद फार माेठी असते हे लक्षात असू द्यावे. खाेटे प्रेम आपणाला ओळखता यावे आणि प्रेमातून हाेणारी फसवणूक अत्यंत भयावह असते. जय जय राम कृष्ण हरी।