नवी मुंबईत अनेक मालमत्ता नाेंदींविना

    01-Mar-2021
Total Views |
सर्वेक्षणाद्वारे करकक्षा वाढवण्याचा महापालिकेचा विचार
 
za4_1  H x W: 0
 
नवी मुंबई, 28 फेब्रुवारी (आ.प्र.) : विविध प्रकारे हाेणारी करवसुली हा महापालिकेच्या उत्पन्नवाढीचा मुख्य स्राेत आहे. असे असूनही गेली 21 वर्षे नवी मुंबई महापालिकेने काेणत्याही प्रकारची करवाढ केलेली नाही. नागरी साेयीसुविधा पुरवताना उत्पन्नवाढ हाेणेही अपेक्षित आहे. मात्र, आजही अनेक मालमत्तांची पालिकेच्या दप्तरी नाेंदच नसल्याने त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना करकक्षेत आणण्याचा विचार महापालिका करत आहे.नवी मुंबई पालिका हद्दीत 3 लाख 21 हजार 696 मालमत्तांची नाेंद आहे. त्यांच्यावर कर निर्धारित करण्यात आले आहेत. त्यात निवासी मालमता 2 लाख 66 हजार 143 असून, 50,035 अनिवासी व 5518 औद्याेगिक मालमत्ता आहेत.त्यांच्याकडून नियमित करवसुली केली जाते. मात्र, आजही पालिका क्षेत्रातील अनेक बांधकामांची पालिकेकडे नाेंद नाही. अधिकृत, अनधिकृत, गावठाण, साडेबारा टक्के बांधकाम अशा वेगवेगळ्या मालमत्तांचा त्यात समावेश आहे.शहरातील गावठाण भागात साडेबारा टक्के बांधकाम मंजूर करण्याबाबतचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे. गावठाणात अनेक ठिकाणी एका बांधकामावर तीन ते चारमजली बांधकामे झाली आहेत. या वाढीव बांधकामांची पालिकेकडे नाेंद नसल्याने एकाच मजल्याच्या घरांचा मालमत्ता कर आकारला जाताे. काेपरखैरणेमध्ये माथाडी कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या माथाडी वसाहतींत सुरुवातीस बैठ्या चाळी उभारण्यात आल्या हाेत्या.आता तेथे तीन मजली वसाहती उभ्या राहिल्या आहेत. या वसाहतींना सामान्य मालमत्ता करच आकाराला जाताे आहे.त्यामुळे पालिकेच्या तिजाेरीत पुरेसा कर जमा हाेत नाही.या पार्श्वभूमीवर एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून या मालमत्ता करकक्षेत आणण्याचा विचार पालिका करत असल्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले. करापाेटी एकूण 23 काेटींची थकबाकी आहे. त्याची वसुली करणे गरजेचे आहे. त्यानंतर शहराच्या जीआयएस सर्वेक्षणाकडे लक्ष दिले जाईल. त्यातून शहरातील मालमत्तांचा खरा तपशील समाेर येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.