सह्याद्रीच्या दक्षिण वनक्षेत्रांत वाघांचा अधिवास

    01-Dec-2021
Total Views |
 
 
चंदगडच्या संवर्धन राखीव क्षेत्रात आढळल्या अस्तित्वाच्या काही पाऊलखुणा
 

sahyadri_1  H x 
काेल्हापूर जिल्ह्यातील चंदगड संवर्धन राखीव वनक्षेत्रात वाघांचा अधिवास आढळून आला आहे.या वनक्षेत्रात नुकतीच वाघाने शिकार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या दक्षिणेकडील वनक्षेत्रांमध्ये वाघांचा अधिवास असल्याचे पुन्हा एकदा समाेर आले आहे.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ हा कर्नाटकातील दांडेली, भीमगड, महाराष्ट्रातील तिलारी, दाेडामार्ग, आजरा बुदारगड, चंदगड, विशालगडमार्गे उत्तरेत चांदाेली व काेयनेपर्यंत भ्रमण करत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राज्य सरकारने 5692 हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या आंबाेली-दाेडामार्ग काॅन्झर्वेशन रिझर्व्ह आणि 22523 हेक्टर क्षेत्रावरील चंदगड संवर्धन राखीव क्षेत्राची घाेषणा केली हाेती. त्यापूर्वी 29.53 चाै.कि.मी.च्या तिलारी संवर्धन राखीव क्षेत्राची स्थापना झाल्याने या भागातील वन्यजीवांचा भ्रमणमार्ग जाेडण्यासाठी मदत झाल्याचे पुन्हा एकदा समाेर आले आहे. या तिन्ही संवर्धन राखीव वनक्षेत्रांत वाघांचा अधिवास आहे.
 
आंबाेलीत यापूर्वी वाघांच्या पावलांचे ठसे आणि त्याने केलेल्या शिकारीचे अवशेष मिळाले आहेत.मध्यंतरी आंबाेली परिसरात वाघाचे छायाचित्र कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाले हाेते. आता तिलारी आणि आंबाेलीच्या वनक्षेत्रांनी जाेडलेल्या चंदगड संवर्धन राखीव क्षेत्रात वाघांचा वावर निदर्शनास आला आहे.नुकतीच तेथे वाघाने रेड्याची शिकार केल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे वाघाच्या अधिवासावर शिक्कामाेर्तब झाल्याचे चंदगडचे परिक्षेत्र वनाधिकारी नंदकुमार भाेसले यांनी सांगितले.भ्रमणमार्ग अखंड ठेवल्याने प्रजनन क्षेत्रातील वाघ व इतर तृणभक्षी प्राणी त्या क्षेत्राला जाेडणाऱ्या इतर जंगलांत आणि संरक्षित वनक्षेत्रात स्वत:चा स्वतंत्र अधिवास निर्माण करू शकतात हे अधाेरेखित हाेते, असे काेल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डाॅ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी सांगितले.