देशातील 43टक्केकर्मचारी मानसिक तणावाखाली

    27-Nov-2021
Total Views |
 
 
 
संध्यानंद. काॅम
 

mental_1  H x W 
 
आपले मानसिक आराेग्य किती महत्त्वाचे असते हे ‘असाेचेम’च्या एका अभ्यासातून सामाेरे आले आहे. भारतात खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे 43 टक्के कर्मचाऱ्यांना कामाच्या जागी मानसिक तणाव जाणवत असल्याचे या अभ्यासात दिसले.मानसिक आराेग्याबाबत जागतिक आराेग्य संघटनेने 2017 मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, जागतिक पातळीवरील नैराश्यात भारतीयांचे प्रमाण 18 टक्के आहे. कामाच्या जागी कर्मचाऱ्यांना येत असलेला मानसिक तणाव ही बहुसंख्य कंपन्यांमधील वस्तुस्थिती असली, तरी मानसिक अनाराेग्य म्हणजे आपल्यावरील कलंक असल्याच्या समजुतीमुळे असे लाेक काेणाची मदत घेण्यास कचरत असल्याचेही चित्र आहे.
 
मानसिक आराेग्याच्या बहुतेक समस्या सामान्य आणि उपाय करण्यासारख्या असतात. पण त्याबाबतच्या गैरसमजुती आणि नकारात्मक विचारांमुळे बहुसंख्य कर्मचारी त्याबाबत बाेलणे टाळतात. कामाच्या जागी असे कर्मचारी चांगले काम करतात; पण आपण आपल्या समस्येबाबत काेणाबराेबर बाेललाे तर आपली प्रतिमा बिघडेल, सहकाऱ्यांबराेबरचे संबंध दुरावतील आणि कदाचित नाेकरी गमवावी लागेल, या भीतीमुळे ते याबाबत काहीही बाेलत नसल्याचे दिसून आले आहे. पण त्याचे परिणाम चांगले नसतात. मानसिक आराेग्याबाबत न बाेलल्याने, उपचार न घेतल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण हाेतात. त्यामुळ संबंधित कर्मचाऱ्याचे कामाचे तास कमी हाेऊन त्याची उत्पादकता घटते आणि त्याचा परिणाम संस्थेवर हाेताे.
 
कर्मचाऱ्यांचे मानसिक आराेग्य उत्तम असणे हे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर संस्था आणि समाजासाठीही चांगले असते. कर्मचाऱ्यांच्या मानसिक आराेग्यासाठी कंपन्या आणि संस्थांना काय करता येईल ते बघा.जागरुकता आणि चर्चा : मानसिक आराेग्याविषयी आणि त्यातील आव्हानांविषयी लाेक जेवढे जागरूक हाेतील, तेवढा गैरसमज दूर हाेण्याचा फायदा मिळेल. मानसिक आराेग्याबाबत प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयाेजन करून कंपन्या कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती दूर करू शकतात. आपल्यावर काेणी तरी नजर ठेवत असल्याची चिंता दूर हाेऊन त्यांना त्यांच्या समस्येबाबत माेकळेपणाने बाेलण्याची संधी मिळायला हवी. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेता येते.
 
भाषेकडे अधिक लक्ष : मानसिक आराेग्याच्या समस्येबराेबर झुंजत असलेल्या कर्मचाऱ्यांबराेबर बाेलताना भाषा काळजीपूर्वक वापरायला हवी. त्यांच्याबराेबर संवाद साधताना अवमानकारक भाषेचा वापर करू नये. त्याची मानसिक अवस्था लक्षात घेऊन शब्द काळजीपूर्वक आणि याेग्य प्रकारे वापरण्याची खबरदारी घ्यावयास हवी.साधनसामग्रीचा वापर : कामाच्या जागी कर्मचाऱ्यांवरील मानसिक तणाव कमी व्हावा म्हणून अनेक कंपन्यांमध्ये ‘एम्प्लाॅयी असिस्टन्स प्राेग्राम’ची (ईएपी) अंमलबजावणी केली जाते. पण काही वेळा संकाेच, लाज वाटत असल्यामुळे काही कार्मचारी या सुविधेचा लाभ घेण्याचे टाळतात. गैरसमजही काही वेळा त्यासाठी कारणीभूत असतात. अशा कर्मचाऱ्यांची मानसिकता समजून घेऊन त्यांना अ‍ॅप किंवा तज्ज्ञांची मदत मिळवून दिली, तर ते त्यांच्या समस्यांबाबत माेकळेपणाने बाेलून मार्ग काढू शकतील.कर्मचाऱ्यांमध्ये संवाद असणेही गरजेचे आहे.