हवाई दल प्रमुख विवेक चाैधरी यांना परमविशिष्ट सेवा पदक प्रदान

    26-Nov-2021
Total Views |
 
 

award_1  H x W: 
 
उल्लेखनीय शाैर्य, दुर्दम्य साहस आणि उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्या हस्ते 2021 चे संरक्षण अलंकरण पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राचे सुपुत्र हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक चाैधरी यांच्यासह राज्यातील सहा अधिकारी व जवानांना या सन्मानाने गाैरवण्यात आले.संरक्षण मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनाच्या दरबार हाॅलमध्ये तिसऱ्या व चाैथ्या टप्प्यात ‘संरक्षण अलंकरण पुरस्कार-2021’ प्रदान करण्यात आले. या समारंभात पंतप्रधान नरेंद्र माेदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्यासह मान्यवर उपस्थित हाेते. राष्ट्रपतींच्या हस्ते अधिकारी व जवानांना कीर्ती चक्र, शाैर्य चक्र, वीरचक्र, परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक आदी सन्मानांनी गाैरवण्यात आले.
 
हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक चाैधरी यांना उत्कृष्ट सेवेसाठी परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. लेफ्टनंट जनरल शशांक उपासनी, लेफ्टनंट जनरल संजय लाेंढे, व्हाईस अ‍ॅडमिरल मुरलीधर पवार यांनाही उत्कृष्ट सेवेसाठी परम विशिष्ट सेवा पदकाने गाैरवण्यात आले. लेफ्टनंट जनरल मिलिंद भुरके आणि व्हाईस अ‍ॅडमिरल राजेश पेंढारकर यांना उल्लेखनीय सेवेसाठी अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. याच समारंभात 4, मराठा लाइट इन्फ्रंट्रीचे मेजर अनिल ऊर्स यांना दुर्दम्य साहसासाठी शाैर्यचक्र प्रदान करण्यात आले.