नवे काही करण्यासाठी धाेका पत्करायला हवा

    24-Nov-2021
Total Views |
 
 
 
 
एकमेकांना केलेल्या सहकार्यातून प्रगतीचा मार्ग खुला हाेताे, विकास हाेताे
 

youth_1  H x W: 
 
 
संध्यानंद.काॅम
 
नव्या वाटेने चालणे कधीच साेपे नसते. रूळलेल्या वाटेने जाणे हे सुरक्षित असते. पण, सगळेच जण असे करायला लागले, तर नावीन्यपूर्ण कल्पना येणार नाहीत आणि जीवन साचेबद्ध हाेईल. चाकाेरीबाहेर जाणे काहींना आवडत असल्यामुळे नवे काही तरी घडते हे लक्षात ठेवायला हवे. सध्याच्या माहितीच्या काळात हा प्रश्न महत्त्वाचा ठरताे.आपल्याला राेज खूप काही माहिती मिळतअसली, तरी त्यातील थाेडीच आपल्या कामाची असते. अशा वेळी काय करावे, हा प्रश्न पडला तर चारा खाणाऱ्या गाईचे उदाहरण समाेर ठेवा. ती प्रथम खाऊन घेते आणि मग रवंथ करून चारा पचवून टाकते. आपण काय करणार आहाेत याची रूपरेषा प्रथम तयार करायला हवी.तिची अंमलबजावणी हा त्यापुढील भाग असताे. पण, तेवढे पुरेसे नाही. त्यासाठी आणखी काय करावे लागेल ते बघा.
 
धाेका पत्करण्याची तयारी : काेणत्याही कामासाठी आपण प्रथम टाकलेले पाऊल सर्वांत महत्त्वाचे असते आणि त्यावर यश किंवा अपयश अवलंबून राहते. पहिले पाऊल कायम जाेखमीचे असल्यामुळे ते टाकण्यापूर्वी सर्वंकष विचार करायला हवा. बहुसंख्यांची जाेखीम स्वीकारण्याची तयारी नसते.पण, विचारपूर्वक जाेखीम घेतली, तर यश मिळू शकते आणि नव्या कल्पना वास्तवात आणता येतात. भगवान श्रीकृष्ण यांचे उदाहरण घ्या. समुद्राच्या मध्यावर द्वारका हे शहर उभारताना त्यांनी माेठी जाेखीम घेतली हाेती हे सत्य आहे. पण, त्यांनी सर्वंकष वचारानंतरच हा निर्णय करून ताे अमलात आणला. आज द्वारका हे शहर जगप्रसिद्ध झाले आहे. म्हणजे, विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयातून चांगले काही साध्य हाेत असल्याचे दिसते.
 
सामाजिक संबंध : सगळ्या समस्या आपल्या आपण साेडवू शकत नाही. काही समस्या साेडविण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागते आणि त्यासाठी उपयाेगी पडतात आपले संबंध, नाती. मानवी संबंधांत विश्वासाला फार महत्त्व असते. ताे पुरेसा असेल, तर समस्या साेडविण्यास मदत मिळते. संबंधांतून विश्वास वाढताे आणि त्यातून नाते दृढ हाेत जाते. चांगल्या नात्यांमधून सर्वांचाच विकास हाेताे. पुन्हा भगवान श्रीकृष्ण यांचे उदाहरण पाहा. त्यांच्या सहवासात आलेल्या सर्वांची त्यांच्यामुळे प्रगती झाली.सद्गुण सर्वांमध्येच असले, तरी ते आपल्याला समजावे लागतात. भगवान श्रीकृष्णांनी तेच केले. त्यांच्या सहवासात आलेल्यांना त्यांनी त्यांच्यातील गुणांची जाणीव करून दिल्यामुळे या लाेकांचा आशावाद वाढून त्यांची प्रगती झाली. त्यातून त्यांचा माेठेपणा वाढला. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, तरुण; पण अत्यंत बुद्धिमान चुलतभाऊ उद्धव याची आपला सल्लागार म्हणून भगवान श्रीकृष्ण यांनी केलेली नेमणूक. उद्धवावर दाखविलेल्या विश्वासामुळे त्याचा आत्मविश्वास अधिक वाढून द्वारकेच्या विकासाला त्याचा हातभार लागला.
 
सहकार्य : काही नवे करावयाचे असेल, तर आपण परिपूर्ण असल्याचा गैरसमज दूर करणे सर्वांत महत्त्वाचे ठरते. आपण परिपूर्ण नसल्याची जाणीव झाल्यावर सहकार्याचा विचार करता येताे. एकमेकांना केलेल्या सहकार्यातूनच प्रगतीचा मार्ग खुला हाेताे. मतभेद असणेसुद्धा प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरते. एकमेकांच्या सहकार्यातून किती माेठे काम करता येते हे समजावून घ्यावयाचे असेल, तर त्यासाठी जरासंधाच्या वधाचे उदाहरण देता येईल.उद्धवाच्या कल्पनेमुळे भगवान श्रीकृष्णाने पांडवांना सहकार्य केले.अर्जुनाचे काैशल्य आणि भीमाची शक्ती यांचे एकत्रीकरण झाले. पण, येथेही भगवान कृष्णाची बुद्धिमत्ता उपयाेगी पडली. त्यांनी जरासंधाला कसे मारावे याचा सल्ला भीमाला दिला आणि त्यानुसार भीम वागल्यामुळे जरासंधाचा अंत झाला.