मुंबई शहर काेराेना संकटातून सावरत असून, सर्व कामकाज जाेमाने सुरू झाल्याचे राेजच्या वीज वापरावरून दिसून येत आहे. मुंबईची विजेची मागणी गेल्या गुरुवारी दुपारी 3200 मेगावाॅटवर पाेहाेचली हाेती. ती झपाट्याने 3500 मेगावाॅटच्या विक्रमी पातळीकडे जात आहे.मुंबईत सर्व बँकांची मुख्यालये, शेअर बाजार, दागिन्यांचा मुख्य बाजार आहे. या निमित्ताने संलग्न उद्याेग, व्यापारही मुंबईत हाेताे. त्यामुळे शहर या नात्याने मुंबईची वीज मागणी देशात अनेकदा सर्वाधिक व सरासरी 2500 मेगावाॅटदरम्यान असते. काेराेना संकटात पहिल्या लाॅकडाउनदरम्यान ही मागणी 1500 मेगावाॅट खाली गेली हाेती.
मात्र, आता ही मागणी हळूहळू 2800 मेगावाॅटवर गेली आहे. नवरात्रापासून बाजारातील मागणी वाढली आहे.मुंबई शहर व उपनगरांत अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल), बेस्ट आणि टाटा पाॅवर या तीन कंपन्यांकडून प्रामुख्याने विजेचा पुरवठा हाेताे. भांडूप ते मुलुंडदरम्यान थाेड्या भागात महावितरणची वीज जाते. यापैकी सर्वाधिक ग्राहकसंख्या व सर्वाधिक मागणी एईएमएलची असते. गुरुवारी या सर्व कंपन्यांच्या ग्राहकांची मिळून सुमारे 3200 मेगावाॅट वीज मागणी हाेती.त्यात एईएमएलची मागणी 1500, टाटा पाॅवरची मागणी 800, बेस्टची मागणी 800 मेगावाॅटच्या घरात व उर्वरित मागणी महावितरणच्या ग्राहकांची हाेती.