प्रभाग रचनेसाठी ‘वेटिंग’ करणाऱ्या नगरसेवकांनी विकासकामांच्या वर्क ऑर्डर ठेवल्या ‘हाेल्ड’वर

    19-Nov-2021
Total Views |
 
 

veting_1  H x W 
 
महापालिका निवडणूक जवळ आली असली, तरी अद्याप प्रभाग रचना जाहीर हाेण्यास काही आठवड्यांचा कालावधी असल्याने नगरसेवकांमध्ये चलबिचल सुरू आहे. एवढेच नव्हे तर अनेकांनी विकासकामांचे अगदी वर्क ऑर्डरपर्यंत नियाेजन केले आहे. मात्र प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतरच संधी मिळेल त्याच भागात कामे करण्यासाठी या वर्क ऑर्डर ‘हाेल्ड’वर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.महापालिकेची निवडणूक अगदी अडीच ते तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे.मागील दीड वर्ष काेराेनामुळे आर्थिक आणीबाणीची राहिली. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ राहावा यासाठी अत्यावश्यक विकासकामांना आणि खर्चाला प्राधान्य देत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी वित्तीय समितीच्या माध्यमातून कामांना व याेजनांना मान्यता देण्याचे अधिकार स्वत:कडे ठेवले. यामुळे नगरसेवक आणि प्रशासन अर्थात प्रामुख्याने महापालिका आयुक्त असा कलगीतुरा मागील काही काळ रंगला आहे.
 
एवढेच नव्हे तर स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते आणि महापाैरांनीही वेळाेवेळी विकास कामांना कात्री न लावता अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करावी, असे आदेशही दिले. अखेर विसंवाद वाढल्यानंतर दाेन्ही बाजूने एक पाऊल मागे घेत नगरसेवकांच्या स यादीतील 30 टक्के कामांना परवानगी दिली. त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवत निविदा काढल्या गेल्या, त्या मंजूरही करण्यात आल्या असून, त्याच्या वर्क ऑर्डरही काढण्यात आल्या आहेत. अशातच पुढील तीन आठवड्यात निवडणुकीसाठीची प्रभाग रचना व आरक्षण जाहीर हाेणार असल्याने कामांसाठी आग्रह धरणाऱ्या काही माननीयांनी कामांच्या वर्क ऑर्डर हाेल्डवर ठेवल्या आहेत.
नव्याने निर्माण हाेणाऱ्या प्रभागांमध्ये विकासकामे करण्यासाठी या वर्क ऑर्डर हाेल्डवर ठेवल्याचे काही नगरसेवक सांगत आहेत. ज्या नवीन प्रभागात संधी मिळेल तिथे शेवटच्या टप्प्यात विकासकामांचा आणि भूमिपूजनांचा धुराळा उडवून मतदारांना आकर्षित करणे साेपे जाणार आहे.