कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जाेडणारा पत्रीपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला

    25-Jan-2021
Total Views |
वाहनचालकांची वाहतूककाेंडीतून सुटका
 
bh_1  H x W: 0
 
कल्याण, 24 जानेवारी (आ.प्र.) : कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जाेडणाऱ्या पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, या पुलाचे उद्घाटन साेमवारी (25 जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने हाेणार आहे.साेमवारपासून पत्रीपुलावरील वाहतूक सुरू हाेणार असून, हा पूल सुरू झाल्यास कल्याण-शिळफाटा मार्गावर, तसेच कल्याण शहरात हाेणाऱ्या वाहतूक काेंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. गेल्या दाेन वर्षांपासून कल्याणकर पत्रीपुलाच्या कामामुळे हाेणाऱ्या वाहतूक काेंडीमुळे त्रस्त हाेते. या प्रकल्पासाठी आतापर्यंत 34 काेटींचा खर्च आल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली.कल्याण-शिळफाटा मार्गावरील वाहतुकीसाठी पत्रीपूल महत्त्वाचा आहे. हा पूल वाहतुकीसाठी धाेकादायक झाल्याने नाेव्हेंबर 2018 मध्ये पाडण्यात आला हाेता. त्यानंतर तीन महिन्यांत या पुलाचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी दिले हाेते. त्यानंतर अनेक कारणांमुळे काम रेंगाळले. या कालावधीत एकाच पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने पत्रीपूल वाहतूक काेंडीचे केंद्र बनले हाेते.पत्रीपूल प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी 34 काेटींचा खर्च आला आहे. पूल सुरू हाेणार असल्याने कल्याणमधील वालधुनी, सुभाष चाैक, गजानन चाैक, रामबाग, कल्याण रेल्वे स्थानक, काेळसेवाडी, नेतीवली, 90 फूट रस्ता या ठिकाणी हाेणाऱ्या वाहतूक काेंडीतून वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.